पुणे विद्यापिठातील रॅप गाणे चित्रीकरण प्रकरणी प्रशासनाकडून पोलिसांकडे तक्रार !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या आवारात अवैध रॅप(गाण्याचा एक प्रकार)  गाणे चित्रीकरण प्रकरणात विद्यापीठ सुरक्षा विभागाचे साहाय्यक अधिकारी सुधीर दळवी यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. संबंधित तरुणांनी तलवार, रिव्हॉल्वर, तसेच अश्‍लील शब्दांचा वापर केल्याने पोलिसांनी रॅप गाणे चित्रित करणार्‍या तरुणांची चौकशी चालू केली आहे; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात उडी घेत विद्रोह दाबता येणार नाही, अशी भूमिका घेत हे गाणे केलेल्या शुभम जाधवला पाठिंबा दिला आहे.

काय आहे प्रकरण ?

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात आणि पुणे विद्यापिठातील मुख्य इमारतीच्या समोर शुभम जाधव या तरुणाने अश्‍लील शब्द असलेले रॅप गाणे गायले होते. गाण्याची ध्वनीचित्रफीत १८ मार्च या दिवशी रॉकसन सल्तन या मथळ्याखाली समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. त्यानंतर गाण्यातील शब्दांवर आक्षेप घेऊन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सरचिटणीस आकाश झांबरे पाटील यांनी विद्यापिठाच्या कुलगुरूंकडे लेखी तक्रार केली. कुलगुरु डॉ. कारभारी काळे यांनी विद्यापिठाने गाण्याच्या चित्रीकरणाला अनुमती दिली नसल्याचे नमूद करून या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे स्पष्ट केले. त्यानंतर विद्यापिठाकडून तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.