समुद्री सुरक्षेसाठी गोवा पोलिसांच्या वेगवान गस्ती नौकेचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते लोकार्पण

समुद्री सुरक्षेसाठी वेगवान गस्ती नौका

वास्को, १३ एप्रिल (वार्ता.) – समुद्री सुरक्षेसाठी गोवा पोलिसांच्या वेगवान गस्ती नौकेचे (इंटरसेप्टर पेट्रोलिंग बोट) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते १३ एप्रिल या दिवशी लोकार्पण करण्यात आले. गोव्याच्या इतिहासात प्रथमच किनारी पोलिसांना समुद्री भागातील अवैध कृत्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेगवान गस्तीनौका सुपुर्द करण्यात आली आहे.

गस्तीनौकेचे लोकार्पण करतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक

वास्को येथील गोवा शिपयार्ड आस्थापनामध्ये हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या वेळी केंद्रीय राज्य पर्यटन आणि बंदर मंत्री श्रीपाद नाईक, वास्कोचे आमदार कृष्णा (दाजी) साळकर, मुख्य सचिव पुनित गोयल, पोलीस महासंचालक जसपाल सिंह, गोवा शिपयार्डचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश कुमार उपाध्याय आदींची प्रमुख उपस्थिती होती. गोवा शिपयार्डने ५ कोटी २५ लाख रुपये खर्च करून ही नौका बांधली आहे.

याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘वेगवान गस्तीनौकेमुळे समुद्री भागातील सुरक्षा आणखी भक्कम होणार आहे. तसेच समुद्री भागात आकाशातून लक्ष ठेवण्यासाठी ‘ड्रोन कॅमेरा’ही कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे समुद्री भागासह भूमीवरील सुरक्षाही आणखी भक्कम होणार आहे.’’ याप्रसंगी पोलीस महासंचालक जसपाल सिंह म्हणाले, ‘‘किनारी पोलिसांकडे असलेल्या ९ गस्तीनौका नादुरुस्त झाल्याने त्या दुरुस्त करून पुन्हा कार्यरत करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. आता नौका प्राप्त झाल्याने अवैध कृत्यांना आळा घालता येणार आहे. १६ एप्रिलपासून ‘जी २०’ परिषदेच्या बैठकांना प्रारंभ होणार असल्याने तत्पूर्वी गोव्यातील किनारी सुरक्षा शक्तीशाली करायची आहे.’’