गोवा : कोलवाळ पोलिसांनी मुशीरवाडा परिसरातून १०१ परप्रांतियांना घेतले कह्यात

जी-२० च्या पार्श्वभूमीवर कारवाई

म्हापसा, १३ एप्रिल (वार्ता.) – ‘जी २०’ परिषदेच्या पार्श्वभूमीवर कोलवाळ पोलिसांनी १३ एप्रिल या दिवशी सकाळी मुशीरवाडा परिसरात ‘कोम्बिंग ऑपरेशन’ चालू केले. या अंतर्गत भाड्याने रहात असलेल्यांची पडताळणी करण्यात आली. या वेळी १०१ जणांना पोलिसांनी कह्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात आणले. यामधील ३९ जणांकडे आवश्यक कागदपत्रे नव्हती. या सर्वांना फौजदारी दंड संहितेअंतर्गत कह्यात घेण्यात आले. पोलीस निरीक्षक सोमनाथ माजिक यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम हाती घेण्यात आली.

याविषयी अधिक माहिती देतांना पोलीस निरीक्षक सोमनाथ माजिक म्हणाले, ‘‘मुशीरवाडा परिसरात सकाळी ६ वाजल्यापासून पडताळणी करत ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवण्यात आले.  गोव्यात १७ ते १९ एप्रिल या कालावधीत होणार्‍या ‘जी २०’ परिषदेच्या बैठकांच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम वरिष्ठांच्या आदेशावरून राबवण्यात आली. मध्यंतरी ‘लाला की वस्ती’ या ठिकाणी अशाच प्रकारे मोहीम राबवण्यात आली होती. विविध राज्यांतून गोव्यात येऊन अनेक जण वास्तव्य करतात; मात्र त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे नसतात, तसेच अनेकांचा गुन्ह्यांमध्येही सहभाग असतो. या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबवण्यात आली.’’

 (सौजन्य : Goan varta live)

संपादकीय भूमिका

केवळ जी-२० कार्यक्रम असल्यामुळे नको, तर गुन्हे रोखण्यासाठी अशी पडताळणी नियमित करणे आवश्यक !