सोलापूरला दैनंदिन पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी सर्वोच्च प्राधान्याने कार्यवाही करावी ! – राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री

मध्यभागी राधाकृष्ण विखे पाटील

सोलापूर, १० एप्रिल (वार्ता.) – सोलापूरला सुरळीत दैनंदिन पाणीपुरवठा करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्याने कार्यवाही करावी, तसेच मंगळवेढा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्ववत् कार्यान्वित करण्यासाठी संबंधित सर्व कार्यालयीन यंत्रणांनी तातडीने मार्ग काढावा, अशा सूचना राज्याचे महसूल, पशूसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकासमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. नियोजन भवन येथे स्मार्ट सिटी आणि सोलापूर विकास आराखडा यांसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी आमदार समाधान अवताडे यांनी मंगळवेढा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना चालू करण्याविषयी आवाहन केले. भोसे आणि अन्य ३९ गावे या ठिकाणी ‘प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, मंगळवेढा’ ही योजना फेब्रुवारी २०२० अखेर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होती. सध्या वीजदेयक न भरल्याने जून २०२१ पासून या योजनेतून पाणीपुरवठा होत नाही.

यावर महावितरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद आदी संबंधित यंत्रणांनी थकित वीजदेयकप्रश्नी मार्ग काढावा, अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.