कुवतीप्रमाणे शिक्षण द्या !

‘आयआयटी’ (भारतीय तंत्रज्ञान संस्था), ‘आय.आय.एम्.’ (भारतीय व्यवस्थापन संस्था) आणि केंद्रीय विश्वविद्यालय यांतील १९ सहस्र २५६ विद्यार्थ्यांनी गेल्या ५ वर्षांत शिक्षण सोडले आहे. हे विद्यार्थी २-३ वर्षांनंतर शिक्षण सोडून जात असल्याची माहिती नुकतीच केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राज्यसभेत लेखी उत्तरात दिली आहे. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनुसूचित जाती, जमाती आणि मागासवर्गीय यांच्यासाठी आरक्षित ठेवलेल्या जागांसाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेला असतो, त्यांपैकी ‘शिक्षण जमत नाही’; म्हणून ते सोडून जाणारे विद्यार्थी अधिक आहेत. वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार भारतात अनुसूचित जाती या वर्गात मोडणारे लोक १६ टक्क्यांहून अधिक आहेत. उत्तरप्रदेशात ते सर्वाधिक आहेत. अनुसूचित जातीमध्ये देशातील लोकसंख्येपैकी ८ टक्के लोक आहेत. आयआयटी, आय.आय.एम्. या भारतातील नामांकित शिक्षणसंस्था असून देशाचे भविष्य घडवणारे विद्यार्थी आणि त्यांच्या माध्यमातून तंत्रज्ञान अन् व्यवस्थापनाच्या नवीन पद्धती येथे जन्माला येतात, असे समजले जाते. देशातील अतिशय प्रगल्भ आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे केंद्र म्हणून या शिक्षणसंस्था ओळखल्या जातात. थोडक्यात देशाच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारी पिढी निर्माण करणार्‍या या संस्था असून यात प्रवेश मिळणेही अत्यंत कठीण असते. अतिशय हुशार आणि सर्वाेत्तम गुण असलेल्या विद्यार्थ्यांनाच अनेक परीक्षा उत्तीर्ण होऊन येथे प्रवेश मिळतो. या संस्थेत प्रवेश मिळाला की, ‘विद्यार्थ्याचे भवितव्य पुष्कळ उज्ज्वल आहे’, असेच समजले जाते. या संस्थांतील सर्व विद्यार्थी ‘अत्यंत बुद्धीमान’ याच पातळीचे असतात. त्यामुळे रात्रंदिन अभ्यास करून ते स्वतःचे आणि पुढे जाऊन देशाचे भविष्य घडवण्यात मोठे योगदान देतात. अशी पार्श्वभूमी असतांना या संस्थांमध्ये आरक्षण म्हणजे अनेक ‘गुणवंत विद्यार्थ्यांनी त्यांची येथील ‘जागा’ गमावलेली आहे’, असे असते; पर्यायाने देशही तेवढा मागे गेलेला असतो. एवढे सगळे झाल्यानंतर काही काळ शिक्षण घेऊन आरक्षणाच्या जागांवर असणारे विद्यार्थी जेव्हा त्यांचे शिक्षण अर्धवट सोडून या संस्थेच्या बाहेर पडतात, तेव्हा विद्यापीठ, समाज, सक्षम गुणवंत विद्यार्थी आणि देश यांची किती हानी झालेली असते, याची कल्पना करू शकतो. मग ‘असे शिक्षण अर्धवट सोडून देणार्‍या विद्यार्थ्यांना आरक्षण देऊन काही उपयोग आहे का ?’, असा प्रश्न गुणवंत विद्यार्थी आणि राष्ट्रप्रेमी यांना पडला, तर त्यात काय चुकीचे ? यामुळे त्या जागांवर शिक्षण घेण्यासाठी जे खरोखरच पात्र होते, अशा गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याने त्यांच्या मनात कटुता आलेली असते. त्यामुळेच देशातील उच्च वर्णियांतील बहुसंख्य मुले विदेशात स्थायिक होतात, असे वाटल्यास नवल ते काय ? यामुळे आरक्षणाचा मूळ हेतूच सफल होत नाही, हे येथे प्रकर्षाने लक्षात घेतले पाहिजे.

परंपरागत व्यवसायांचे महत्त्व

आज कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय यांसारख्या पदव्या घेतल्या, मोठ्या वेतनाची किंवा शासकीय चाकरी मिळाली की, तो मुलगा आयुष्यात स्थिरस्थावर झाला, असे समजण्यात येते. ही सर्वसाधारण मध्यमवर्गियांची एक चाकोरी झाली आहे. या चाकोरीबद्ध कारकून सिद्ध करण्याच्या शिक्षणपद्धतीची रुजवात इंग्रज अधिकारी मेकॉलेने ‘ईस्ट इंडिया कंपनीत कर्मचारीवर्ग मिळवण्यासाठी केली’, हे आपण सर्व जण जाणतो. इंग्लडच्या तत्कालीन संसदेत त्याने स्वतः ‘भारतीय गुरुकुल परंपरेचा, त्या वेळी संपूर्ण भारतात सर्वांना शिक्षण उपलब्ध असल्याचा, सर्व जातींतील प्रचंड विद्यार्थीसंख्या तेथे शिक्षण घेत आहे’, असा अपार गुणगौरव करत अहवाल सादर केला आणि ‘ही अतीप्रगत गुरुकुलपद्धत नियोजनपूर्वक उद्ध्वस्त करून तेथे कारकूनी शिक्षणपद्धत निर्माण करण्याच्या षड्यंत्रा’ची माहितीही दिली. याची फळे आता सर्व भारत भोगत आहे. एकेकाळी सोन्याचा धूर निघणारा देश दरिद्री होण्यामागे ‘भारतातील शिक्षणपद्धत उद्ध्वस्त होणे’, हे एक महत्त्वाचे कारण आहे. या प्राचीन शिक्षणपद्धतीत बारा बलुतेदार पिढ्यान्‌पिढ्या त्यांच्या मुलांना त्यांच्या धंद्याचे शिक्षण देत. त्यांच्या गुणसूत्रांतून आलेल्या गुणांमुळे ही मुले पुढे उत्कृष्ट सुतार, बांधकाम करणारे, लोहारकाम, कोष्टी (वीणकर), सोनार, चामड्याच्या वस्तू बनवणारे, तेली, न्हावी, वाणी (व्यापारी) आदी बनत आणि परिणामी समाजव्यवस्था आदर्श अन् उत्तम रहात असे. यातील कुणाला त्याचा व्यवसाय सोडून दुसरे शिक्षण घेण्याची इच्छा असेल, तर तेही गुरुकुलात उपलब्ध असे. क्षत्रिय आणि ब्राह्मण यांना त्यांचे अनुक्रमे समाजाचे रक्षण करणे अन् धर्मज्ञान जपून ते वाढवणे आणि सर्वांना मार्गदर्शन करणे आदी वैशिष्ट्यपूर्ण कामे वाटून दिली गेल्याने त्यांच्या क्षमतेनुसार तेही समाजाला पूरक ठरून समाजाची आदर्श घडी बसलेली होती. ‘हीच व्यवस्था आदर्श होती’, असे आता मोठ्या संशोधनातून परत पुढे येत आहे; कारण अनेक पिढ्यांची गुणसूत्रे ही त्या विद्यार्थ्याचे ज्ञान वाढवण्यास पोषक ठरत असतात. आता ज्यांची बौद्धिक कुवत नाही, त्यांनाही बळजोरीने या चाकोरीबद्ध शिक्षणपद्धतीत बसवल्याने जे काही होत आहे, ते म्हणजे सध्याच्या शिक्षणव्यवस्थेत समोर येत असलेल्या भयंकर त्रुटी आहेत. विद्यार्थ्यांनी अभ्यास न करणे, शिकवणीवर्गांची नवरूढी, प्रचंड प्रमाणात वाढलेली कॉपी, प्रवेशप्रक्रियेसाठी प्रचंड स्पर्धा, या सर्वांसाठी होणारा भ्रष्टाचार, पुढे नोकरीचा संघर्ष आणि त्यासाठी होणारा भ्रष्टाचार आदी शिक्षणव्यवस्थेतील जे काही म्हणून अपप्रकार बोकाळले आहेत, त्या सर्वांच्या मुळाशी अयोग्य पद्धतीची शिक्षणव्यवस्था आहे, असे म्हटले, तर चुकीचे ठरू नये. या सर्व अपप्रकारांमध्येच ‘आरक्षण’ ही राजकीय आणि काँग्रेसी तुष्टीकरणाच्या परंपरेने चालू केलेली अत्यंत चुकीची पद्धत आहे. येत्या काळात आदर्श समाजाची निर्मिती करायची झाल्यास आणि सर्वांना शिक्षणात खरोखरच्या समान संधी उपलब्ध करून द्यायच्या झाल्यास गुणवंतांनाच संधी दिली गेली पाहिजे, यावर दुमत असणार नाही !

उच्च शिक्षणाची संधी देतांना विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विचार न केल्यास तो गुणवंतांवर मात्र अन्याय ठरेल !