अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर लागवड करूया !

‘या वर्षी २२.४.२०२३ या दिवशी ‘अक्षय्य तृतीया’ आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या शुभदिनी उन्हाळी पिकांची पेरणी करण्यास आरंभ केला जातो. ‘या दिवशी बियाणे पेरण्यास प्रारंभ केल्यास त्या बियाण्यांपासून विपुल धान्य पिकते आणि बियाण्यांचा कधीही तुटवडा भासत नाही’, असे मानले जाते. या दिवशी शेतात आळे करून त्यात बिया पेरल्या जातात. ‘या दिवशी लावलेली फळझाडे आणि औषधी वनस्पती यांचा कधी क्षय होत नाही’, असेही मानले जाते.

सौ. राघवी कोनेकर

१. पूर्वीच्या कृषीविषयक ग्रंथातील उल्लेख !

पराशरऋषींनी रचलेल्या ‘कृषिपराशर’ या ग्रंथातही ‘वैशाखे वपनं श्रेष्ठम् ।’ म्हणजे ‘वैशाख मासात केलेली पेरणी सर्वश्रेष्ठ आहे’, असा उल्लेख आढळतो. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लागवड करणे शक्य न झाल्यास वैशाख मासात उन्हाळी भाज्यांची लागवड करण्याचा प्रयत्न करावा.

२. अक्षय्य तृतीयेआधी पूर्वसिद्धता कशी करावी ?

अ. पालापाचोळा, घनजीवामृत आणि माती यांचे मिश्रण करावे अन् त्यावर पाणी घालून पातळ केलेले जीवामृत (देशी गायीचे शेण, गोमूत्र, बेसन आणि गूळ यांच्यापासून बनवलेले मिश्रण) शिंपडावे. हे मिश्रण ४८ घंटे झाकून ठेवावे. ४८ घंटे झाल्यावर या मिश्रणाने आपल्याकडील कुंड्या किंवा वाफे भरून ठेवावेत. या मिश्रणातील ओलावा टिकून राहील, इतके पाणी त्यावर नियमित शिंपडावे.

आ. आपल्याकडील जागेच्या उपलब्धतेनुसार ‘कोणकोणता भाजीपाला लावणार ?’, हे निश्चित करून त्यांचे बियाणे आणून ठेवावे. भाज्यांची निवड करतांना ‘एकदल-द्विदल अशी मिश्र लागवड करायची आहे’, हे लक्षात घेऊन नियोजन करावे. ‘या कालावधीत कोणती लागवड करू शकतो ?’, याची सूची लेखात पुढे दिली आहे.

इ. वेलवर्गीय भाज्यांच्या वेली चढवण्यासाठी मांडव करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे मांडवाची जागा निश्चित करून वेलवर्गीय भाज्या लावण्याचे नियोजन करावे.

ई. पेरणीपूर्वी न्यूनतम ३ दिवस आधी जीवामृत सिद्ध करावे, म्हणजे नवीन बियाणे पेरल्यावर अथवा रोपे लावल्यावर त्यांना जीवामृत देता येईल. बीजसंस्कार करून रोपे आणि बिया लावण्यासाठी पेरणीपूर्वी २४ घंटे आधी बीजामृत सिद्ध करून ठेवावे.

उ. रोपवाटिकेतून आणून फळझाडे किंवा औषधी वनस्पती यांची रोपे लावायची असल्यास ती अक्षय्य तृतीयेपूर्वीच आणून ठेवावीत.

‘वरील सर्व कृती नेमकेपणाने कशा कराव्यात ?’, याविषयीची विस्तृत माहिती देणारे लेख आणि माहितीपट सनातनच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यांच्या मार्गिका (लिंक) पुढे दिल्या आहेत.

३. अक्षय्य तृतीयेला पुढील भाजीपाल्याची लागवड करू शकतो !

३ अ. वेलवर्गीय भाज्या : दुधी भोपळा, दोडकी, कारले, काकडी, भाेपळा, तसेच तोंडली इत्यादी

३ आ. कंदभाज्या : अळू, आले, हळद, आंबेहळद आणि सुरण इत्यादी

३ इ. फळभाज्या : वांगी, मिरची, सिमला मिरची आणि भेंडी इत्यादी

३ ई. शेंगभाज्या : गवारी, शेवगा, सर्व प्रकारचे घेवडे आणि पावटे इत्यादी

याबरोबरच मका, कढीपत्ता, विविध फळझाडे आणि औषधी वनस्पती यांचीही रोपे या कालावधीत लावू शकतो.

४. अक्षय्य तृतीयेला लागवड करून कृषीपरंपरा जतन करूया ! 

या सर्व भाज्यांची लागवड अक्षय्य तृतीयेच्या दिवशी किंवा वैशाख मासांत केल्यामुळे पुढील १ – २ मासात त्यांची चांगली वाढ होते. आषाढाच्या आरंभी पाऊस चालू झाल्यास तोपर्यंत रोपे मोठी झाल्याने ती वारा आणि पाऊस यांत तग धरू शकतात.

‘अकितीला आळं, तर बेंदराला फळं’ या म्हणीनुसार ‘अक्षय्य तृतीयेला केलेल्या लागवडीतून आषाढ पौर्णिमेच्या काळात येणार्‍या ‘बेंदूर’ या सणापर्यंत फळे मिळण्यास आरंभ होतो’, असे परंपरेने भारतीय शेतकरी मानत आला आहे. आपणही या दिवशी लागवड करून या कृषीपरंपरा जतन करूया !’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (१.४.२०२३)

लागवड करण्यासाठी आतापर्यंत तुम्ही केलेले प्रयत्न आणि तुम्हाला आलेले अनुभव आम्हाला पुढे दिलेल्या ई-मेल पत्त्यावर अवश्य लिहून पाठवा. लागवडीविषयी तुमच्या काही शंका असल्यास त्यासुद्धा येथे विचारू शकता.

अनुभव पाठवण्यासाठी ई-मेल पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता: सौ. राघवी मयूरेश कोनेकर, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा, पिन – ४०३४०१.

जीवामृत आणि बीजामृत बनवण्याची पद्धत, तसेच कुंडी अन् वाफे कसे भरावेत

https://www.sanatan.org/mr/a/82985.html

………………………………………………………………………………………………………………………

विविध भाज्यांची लागवड कशी करावी ?, तसेच भाज्यांसाठी मांडव सोप्या पद्धतीने कसा करावा ?

https://www.sanatan.org/mr/a/category/survive-during-the-adverse-times/survival-guide/vegetable-garden