विवाहाच्या आधी करण्यात येणारे छायाचित्रीकरण बंद !

नंदुरबार येथील गुरव समाजाचा स्तुत्य निर्णय !

प्रतिकात्मक छायाचित्र

नंदुरबार – येथील गुरव समाजाने विवाहाच्या आधी करण्यात येणार्‍या छायाचित्रीकरणाला (प्री वेडिंग फोटोशूट) विरोध दर्शवत तो प्रकार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी न्यूनतम पैशांत लग्न करण्याचे येथील सर्वसाधारण सभेत ठरवण्यात आले.

या बैठकीत गुरव समाजाचे अध्यक्ष सुधाकर रमेश गुरव यांनी विवाहाच्या आधी करण्यात येणार्‍या छायाचित्रीकरणाच्या संदर्भात प्रस्ताव मांडला. सर्वांनीच तो तत्परतेने मान्य केला.

‘अशा प्रकारात पाश्चिमात्य पद्धतीचे कपडे वधूला घालायला लावणे आणि वर-वधूंच्या वैयक्तिक क्षणांची छायाचित्रे काढणे, त्याचे प्रदर्शन विवाह समारंभात मोठ्या डिजिटल पडद्यावर करणे हे अयोग्य असल्याने याला नकार द्यावा’, असा निर्णय घेण्यात आला.

‘साखरपुड्याचा कार्यक्रम थोडक्यात करावा, अल्प लोकांना लग्नाला घेऊन जावे, फक्त पाचच साड्या घ्याव्यात, अनावश्यक खर्च वाचण्यासाठी सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी प्रयत्न करावा, मंदिरात लग्नास प्राधान्य द्यावे, लग्नात आहेर मोजका आणि जवळच्या नातेवाइकांनाच द्यावा’, असे ठराव करण्यात आले. ‘उत्तरकार्याच्या वेळी जवळच्या नातलगांनाच टोप्या द्याव्यात; कारण नंतर त्या पडून रहातात’, असाही प्रस्ताव संमत करण्यात आला.

संपादकीय भूमिका

विवाहाच्या संदर्भात पाश्चिमात्यांचे केले जाणारे अंधानुकरण रोखण्यासाठी असे निर्णय घेणे उचित !