गोवा : कळंगुट-कांदोळी किनार्‍यावरील  अवैध शॅक्सना टाळे ठोकण्यास प्रारंभ

(शॅक म्हणजे पर्यटन हंगामात उभारण्यात येणारी तात्पुरती उपाहारगृहे)

म्हापसा, ३ एप्रिल (वार्ता.) – राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची अनुज्ञप्ती न घेताच कळंगुट-कांदोळी किनार्‍यावरील पर्यटन शॅक्सना टाळे ठोकण्याच्या प्रक्रियेला ३ एप्रिलपासून प्रारंभ झाला. बार्देश तालुक्याचे मामलेदार प्रविण गावस यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या या कारवाईत ११३ शॅकना टाळे ठोकले जाणार आहे.

(सौजन्य : OHeraldo Goa) 

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने गेल्या आठवड्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाची अनुज्ञप्ती न घेताच चालवल्या जाणार्‍या पर्यटन शॅक्सवर कारवाई करण्याचा आदेश दिला होता. आदेशानुसार ‘१६१ शॅकमालकांकडे मंडळाची अनुज्ञप्ती नसल्याने सर्व शॅक्सना टाळे ठोकण्यात यावे’, असे आदेशात म्हटले होते; मात्र दिलेल्या आदेशानंतर ४८ शॅक व्यावसायिकांनी मंडळाकडून अनुज्ञप्ती घेतली. ११३ शॅक व्यावसायिकांनी प्रक्रिया पूर्ण न केल्याने त्यांना टाळे ठोकण्यास प्रारंभ झालेला आहे. कारवाईसाठी १० पथके सिद्ध करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकामध्ये मामलेदार, पोलीस, पर्यटन खाते, ‘सी.आर्.झेड्.’ आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे आणि इतर संबंधित खाते यांचे प्रतिनिधी आहेत. ३ एप्रिल या दिवशी सुमारे ३० हून अधिक शॅक्सना टाळे ठोकण्यात आले. त्या वेळी काही जणांकडून किरकोळ प्रतिकार झाला; परंतु एकूण प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका

  • न्यायालयात याचिका प्रविष्ट झाल्यावर न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर शॅक्सना टाळे ठोकणारे प्रशासन अवैध शॅक्स उभारले जात असतांना काय करत असते ?
  • टाळे ठोकण्यासाठी येणारा खर्च आधीच कारवाई न करणार्‍या संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांकडून का वसूल करू नये ?
  • अनुज्ञप्ती न घेताच १६१ शॅक्स उभे राहीपर्यंत त्यावर कारवाई न करणे, ही प्रशासनाची निष्क्रीयता कि शॅकवाल्यांशी साटेलोटे ?