शाळेच्या उत्सवातील कार्यक्रमातील सादरीकरणात आतंकवाद्याला मुसलमान दाखवल्याने १० जण कह्यात !

 

  • पेरांबरा (केरळ) येथील घटना !

  • न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई

पेरांबरा (केरळ) – येथे राज्यस्तरीय शालेय उत्सवाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातील एका सादरीकरणात मुसलमानांना आतंकवादी दाखवण्यात आल्यावरून पोलिसांनी १० लोकांना कह्यात घेतले. यामध्ये ‘मल्ल्याळम् थिएट्रिकल हेरीटेज अँड आर्ट्स’ने (‘माथा’ने) एक संगीतमय सादरीकरण केले होते. त्यात भारतीय सैन्याने एका आतंकवाद्याला पकडले, असे दाखवले होते. आतंकवाद्याला अरबी मुसलमानाच्या रूपात दाखवण्यात आले होते.

१. याविषयी ‘राजीव गाँधी स्टडी सर्कल’चे संचालक अनूप व्ही.आर्. यांनी पोलिसांत तक्रार केली होती. पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला होता. त्यामुळे अनूप यांनी कोळीकोड न्यायालयात खटला प्रविष्ट करून कारवाई करण्याची मागणी केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद करून कारवाई केली. हा कार्यक्रम ३ जानेवारी २०२३ या दिवशी झाला होता.

२. या प्रकरणी ‘माथा’ने म्हटले की, आतंकवाद्याला मुसलमान दाखवण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता आणि आमची संघटना कोणत्याही राजकीय विचारांशी संबंधित आहे. आमच्यावरील संघाचे विचार पसरवण्याचा आरोप निराधार आहे.