प्रा. वेलिंगकर यांच्या मातृभाषा आंदोलनावरील ‘लोटांगण’ पुस्तकाचे उद्या प्रकाशन

पणजी, ३१ मार्च (पत्रक) – ‘लोटांगण’ या मातृभाषा आंदोलनावरील प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर यांच्या पुस्तकाचे विमोचन ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्राचार्य माधव कामत यांच्या हस्ते, रविवार, २ एप्रिल २०२३ या दिवशी दुपारी ४.३० वाजता, इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा (मोठ्या) सभागृहात करण्यात येणार आहे. सन्माननीय अतिथी म्हणून गोमंतक मराठी अकादमीचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळ उपस्थित रहाणार आहेत.

प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर

श्रीविद्या प्रतिष्ठान या प्रकाशन संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात येत असलेल्या या पुस्तकात गोव्यातील संघकार्याचा आढावा घेत असतांनाच मातृभाषा आंदोलनातून संघाने आकस्मिक माघार घेण्यामागील कारणे आणि पार्श्वभूमी यांचा तपशिलवार आढावा, तसेच या कालावधीत गोव्यातील तत्कालीन भाजप सरकारच्या हालचाली पुराव्यांनिशी मांडण्यात आल्या आहेत. या पुस्तकाने संपूर्ण गोव्यात आणि देशभरात मोठी उत्सुकता निर्माण केली आहे.

हितचिंतकानी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून गोव्यातील एका ज्वलंत चळवळीवर प्रकाशझोत टाकणार्‍या ‘लोटांगण’च्या विमोचन कार्यक्रमास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन प्रकाशक श्रीविद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन फळदेसाई आणि लेखक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी केले आहे.