कराची (पाकिस्तान) येथे हिंदु डॉक्टरची हत्या !

यापूर्वी कराचीत याच मासात झाली होती एका हिंदु डॉक्टरची हत्या !

हिंदु डॉक्टर बिरबल जेनानी यांची अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या

कराची (पाकिस्तान) – येथे ३० मार्च या दिवशी नेत्रतज्ञ असणारे हिंदु डॉक्टर बिरबल जेनानी यांची अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. जेनानी यांनी कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशनमध्ये आरोग्य विभागाचे वरिष्ठ संचालकपद भूषवले होते. पोलिसांनी या घटनेला ‘लक्ष्यित हिंसा’ (टार्गेटेड किलिंग) म्हटले आहे.

१. डॉ. जेनानी हे त्यांच्या साहाय्यक डॉक्टरांसह रामास्वामी भागातून गुलशन-ए-इकबाल येथील त्यांच्या घराकडे जात असतांना बंदूकधार्‍याने त्यांच्या वाहनावर गोळीबार चालू केला. यात त्यांना गोळ्या लागल्यामुळे त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी भिंतीवर आदळली. डॉ. जेनानी यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या साहाय्यकाला गोळ्या लागल्याने तो घायाळ झाला. सिंधचे राज्यपाल कामरान खान यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी पोलिसांकडून अहवाल मागवला आहे.

२. याच मासामध्ये त्वचारोग तज्ञ डॉ. धरमदेव राठी यांचीही हत्या करण्यात आली होती. त्यांचा वाहनचालक हनीफ लेघारी याने त्यांची हत्या केली होती. डॉ. राठी यांनी हत्येच्या पूर्वी त्यांच्या मित्रांसमवेत होळी साजरी केल्याच्या रागातून हनीफ याने डॉ. राठी यांची गळा दाबून हत्या केली होती.

संपादकीय भूमिका

पाकिस्तान हिंदूंना रहाण्यास सुरक्षित नसल्याने, तेथील हिंदूंनी भारतात येणेच श्रेयस्कर !