आरोपीच्या विरोधातील प्रथमदर्शनी अहवाल रहित करण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाचा नकार

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात द्वेषयुक्त भाषण पोस्ट केल्याचे प्रकरण !

प्रयाग (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आध्यात्मिक नेते धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या विरोधात फेसबुकवर द्वेषयुक्त भाषण पोस्ट करणार्‍या व्यक्तीविरुद्ध नोंदवण्यात आलेला प्रथमदर्शनी अहवाल (एफ्.आय.आर्.) रहित करण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाने नकार दर्शवला. भीम आर्मीचे सदस्य याचिकाकर्ता दीपक याने भारतीय दंड संहितेच्या कलम ५०५(२) (सार्वजनिक गैरवर्तन)च्या अंतर्गत नोंदवलेला खटला रहित करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

याचिकाकर्ता दीपक याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि शास्त्री यांच्या विरोधात फेसबुकवर अपशब्द वापरल्याचा आरोप विजयकुमार गौतम यांनी तक्रारीत केला होता.
उच्च न्यायालयाने याचिका फेटाळतांना म्हटले, ‘प्रथमदर्शनी अहवालाच्या अवलोकनावरून असे म्हणता येणार नाही की, कोणताही दखलपात्र गुन्हा घडलेला नाही. त्यामुळे प्रथमदर्शनी अहवाल रहित करण्यासाठी किंवा याचिकाकर्त्याच्या अटकेला स्थगिती देण्याचे कोणतेही कारण अस्तित्वात नाही.’