चीन आणि पाकिस्तानने प्रादेशिक अखंडता आणि सीमांचा आदर करावा ! – अजित डोवाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक

नवी देहली – ‘शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन’च्या सदस्य देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक येथे पार पडली. या बैठकीत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनचे विस्तारवादी, तसेच पाकिस्तानचे आतंकवाद्यांना खतपाणी घालण्याच्या धोरणांवर टीका केली. ते म्हणाले, ‘‘कोणत्याही प्रकारचा आतंकवाद हा आंतरराष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे. सर्व देशांनी आतंकवादाचा सामना करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार दायित्व पार पाडले पाहिजे. अनेक देशांसमोर सुरक्षेचे आव्हान आहे. हे लक्षात घेऊन सदस्य राष्ट्रांमध्ये एकमेकांचे सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि सीमा यांचा परस्पर आदर असायला हवा.’’ ‘शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन’च्या सदस्य देशांमध्ये भारत, पाकिस्तान, चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांचा समावेश आहे.