संजय राऊत यांच्याविषयी राज्यसभेचे अध्यक्ष घेणार निर्णय !

खासदार संजय राऊत यांच्यावरील हक्कभंगाच्या कारवाईला वेग !

खासदार संजय राऊत

मुंबई, २५ मार्च (वार्ता.) – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरील हक्कभंगाच्या प्रस्तावित कारवाईने वेग धरला आहे. राऊत यांच्या विरोधातील हक्कभंग प्रस्ताव २५ मार्च या दिवशी विधानसभेत मांडण्यात आला. त्यानंतर तो पुढील कारवाईसाठी राऊत सदस्य असलेल्या राज्यसभेच्या अध्यक्षांकडे पाठवण्यात आला आहे.

महाराष्ट्र विधानसभेला खासदार संजय राऊत हक्कभंगाप्रकरणी दोषी आढळले आहेत. त्यांच्या उत्तराने सभागृहाचे समाधान झालेले नाही. राऊत राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यामुळे पुढील कारवाईसाठी त्यांच्या विरोधातील प्रस्ताव उपराष्ट्रपती तथा राज्यसभेच्या पदसिद्ध अध्यक्षांना पाठवला जात आहे, अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाला दिली.

विधानसभेत हक्कभंग सादर केल्यानंतर हे प्रकरण आता राज्यसभेकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे तिथे राऊत यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाते कि हे प्रकरण थंड बस्त्यात टाकले जाते, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.