गोवा : अटल सेतू पूल वाहतुकीसाठी अंशत: खुला

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते फोंडा आणि पणजीकडील भाग वाहतुकीसाठी खुला

अटल सेतु, गोवा

पणजी, २५ मार्च (वार्ता.) – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २५ मार्च या दिवशी सायंकाळी अटल सेतूला फोंडा आणि पणजी येथून जोडणारा भाग वाहतुकीसाठी खुला केला. हे दोन्ही भाग दुचाकीसह सर्व वाहतुकीसाठी खुले करण्यात आल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या वेळी घोषित केले. मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘अटल सेतूचा पणजी-म्हापसा भाग पुढील ५ दिवसांत, एकेरी वाहतूक २ एप्रिल या दिवशी, तर सर्व वाहतुकीसाठी हा पूल १० ते १२ एप्रिलपर्यंत खुला करण्यात येणार आहे. राज्यात १० वीच्या परीक्षा चालू होत असल्याने ‘अटल सेतू’ पूल अंशत: चालू करण्याचा निर्णय घेतला आहे.’’

डागडुजीच्या कामामुळे अटल सेतू पूल काही दिवस वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. यामुळे या मार्गावरील वाहतूक मांडवी नदीवरील अन्य दोन पुलांवरून वळवण्यात आली. अटल सेतूवर पूर्वी केलेले डांबरीकरण आणि वापरलेल्या रसायनाचा थर काढून टाकावा लागत असल्याने या कामाला विलंब होत आहे. अटल सेतू वाहतुकीस बंद केल्यापासून गेले काही दिवस पणजी आणि पर्वरी येथे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत आहे. ‘अटल सेतू’ आता अंशत: वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने वाहतूक काही प्रमाणात सुरळीत होण्यास साहाय्य होणार आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २५ मार्च या दिवशी सकाळी अधिकार्‍यांसमवेत ‘अटल सेतू’च्या कामाची पहाणी केली. त्यानंतर पत्रकारांना ते म्हणाले, ‘‘अटल सेतूवरील काँक्रिटीकरण पक्के होण्यासाठी या रस्त्यावर प्रभावी रसायनाचा थर वापरण्यात आला होता. तो थर काही ठिकाणी निकामी झाल्याने हे तंत्रज्ञान पालटून आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानानुसार ‘मेंब्रेन लेयर’ नव्याने टाकण्यात येत आहे; मात्र या कामाला वेळ लागणार आहे. देशभरात असे काम करणारी केवळ दोनच यंत्रे आहेत आणि या दोन्ही यंत्रांच्या माध्यमातून हे काम करण्यात येत आहे. नागरिकांनी थोडी कळ सोसावी.’’