राहुल गांधी यांच्या शिक्षेचे केले समर्थन !
मुंबई, २५ मार्च (वार्ता.) – आजही काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा अवमान केला. राहुल गांधी वारंवार सावरकरांचा अवमान का करतात ? सावरकर हे देशाचे दैवत आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी यातना सहन केल्या. त्यामुळे राहुल गांधी यांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. आजही ते म्हणाले की, क्षमा मागायला मी सावरकर नाही. ते सावरकरांना काय समजतात ? असा प्रश्न विचारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २५ मार्च या दिवशी सभागृहात राहुल गांधी यांचा निषेध व्यक्त केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले की,
१. विरोधकांनी उत्तर न ऐकताच सभागृहातून पळ काढला. काही लोक सभागृहाबाहेर स्टंट करण्यात मग्न आहेत. त्यांच्यात उत्तर ऐकण्याचे धाडस नाही. राहुल गांधी यांनी सेल्युलर कारागृहात राहून दाखवावे.
२. राहुल गांधी यांनी मोदी यांच्या विरोधात वक्तव्य केले. त्यांना न्यायालयाने शिक्षा दिली आहे. त्याची कार्यवाही लोकसभा सभागृहाने केली.
३. अजूनही ते तसे वक्तव्य करत आहेत. महाराष्ट्रातील जनता हे विसरणार नाही. त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही.
४. ज्या कायद्यामुळे राहुल गांधी निलंबित झाले, तो कायदा माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे नेते मनमोहनसिंग यांच्याच कार्यकाळात झाला आहे. त्यामुळे त्यावर आक्षेप घेण्याचे कारण काय ?
५. अधिवेशनात विक्रमी कामकाज केले. पंचामृत योजनेमुळे आपण प्रत्येक घटकापर्यंत पोचलो. मेट्रोची योजना पुढे आणली.
६. महिलांसाठी एस्.टी.मध्ये ५० टक्के सवलत दिली. याचा आपण ७ दिवसांत अध्यादेश काढला. त्यामुळे हे खर्या अर्थाने गतीमान सरकार आहे. यामुळे विरोधकांना धडकी भरली आहे.
७. आनंदाचा शिधा हा पाडवा ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत देणार आहोत. आज बळीराजावर संकट आलेले आहे. शेतकर्यांना सरकार वार्यावर सोडणार नाही.
८. अडचणीच्या काळात मागे-पुढे पहाणार नाही. एन्.डी.आर्.एफ्.चे नियम डावलून शेतकर्यांना साहाय्य केले आहे. ५० सहस्र रुपयांपर्यंत हानी भरपाई शेतकर्यांना देत आहोत.
९. कुणाची खासगी मालमत्ता किंवा प्रायव्हेट लिमिटेड आस्थापनाप्रमाणे सरकार काम करत नाही.