श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २२ मार्च या दिवशी काश्मीरमधील कुपवाडा येथून ३० किलोमीटर अंतरावर भारत-पाक नियंत्रण रेषजवळील करनाह सेक्टरच्या टीटवाल येथे असणार्या प्राचीन श्री शारदादेवी मंदिराचे (शारदा पिठाचे) पुनर्निर्माण केल्यानंतर ऑनलाईन उद्घाटन केले. गेली अनेक दशके हे मंदिर दयनीय स्थितीत होते.
या वेळी गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, आमचे सरकार करतारपूर कॉरिडॉर (सुसज्ज मार्ग) प्रमाणे श्री शारदादेवी मंदिरापर्यंत जाण्यासाठीच्या रस्त्याचे काम करत आहे. कलम ३७० हटवल्यापासून काश्मीरमधील प्राचीन परंपरा आणि संस्कृती पुनर्स्थापित होत आहे. शारदा पीठ हे भारताच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि शैक्षणिक वारसेचे ऐतिहासिक केंद्र आहे. एकेकाळी शारदा पीठ या उपमहाद्वीपमधील ज्ञानाचे केंद्र होते. आध्यात्मिक ज्ञानासाठी संपूर्ण देशातून विद्वान येथे येत होते. चैत्र नवरात्रीच्या पूर्वी येथे मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. हे केवळ मंदिराचे पुनर्निर्माण नाही, तर शारदा संस्कृतीचा शोध घेण्याचा प्रारंभ आहे. हे शक्तिपिठांपैकी एक आहे. येथे माता सतीचा डावा हात पडाला होता, तसेच क्षीरसागरातील अमृतमंथनातून सापडलेले अमृत येथे आणले गेले होते. त्याचे २ थेंब येथे पडले तेच येथे मूर्तीच्या रूपात स्थापित झाले. येथे आदि शंकराचार्य आले होते आणि त्यांनी श्री सरस्वतीमातेची स्तुती केली होती.
केन्द्रीय गृह एवं सहकारिता मंत्री श्री @AmitShah ने आज वीडियो कॉन्फ़्रेंसिंग के माध्यम से जम्मू-कश्मीर के कुपवाड़ा में ‘श्री शारदा पीठं श्रृंगेरी मठ’ द्वारा बनाये मां शारदा देवी मंदिर का उद्घाटन किया।
प्रेस विज्ञप्ति:https://t.co/HszCHcQ9z2 pic.twitter.com/HEyeJCjLoZ
— गृहमंत्री कार्यालय, HMO India (@HMOIndia) March 22, 2023
डिसेंबर २०२१ मध्ये या मंदिराच्या पुनर्निर्माणाला प्रारंभ करण्यात आला होता. ‘सेव्ह शारदा समिती’ने मंदिर निर्माण समितीची स्थापना केली. यात स्थानिक ३ मुसलमान, १ शीख आणि १ काश्मिरी हिंदु यांचा समावेश आहे. मंदिरासमवेतच गुरुद्वारा आणि मशीद हेही बांधण्यात येत आहे.
शारदा पिठाचा (मंदिराचा) इतिहास !
शारदा पीठ श्री सरस्वतीदेवीचे प्राचीन मंदिर आहे. ते २ सहस्र ४०० वर्षांहून अधिक जुने आहे. शक्तिची आराधना करणार्या शाक्त संप्रदायाचे हे पहिले तीर्थस्थळ आहे. काश्मीरमधील याच मंदिरातून सर्वप्रथम देवीची आराधना करण्यास प्रारंभ झाला. यानंतरच श्री वैष्णोदेवी आणि खीर भवानी मंदिर यांची स्थापना झाली.
ख्रिस्त पूर्व २३७ मध्ये मगध सम्राट अशोक याने हे मंदिर बांधले होते. यावर अनेकदा आक्रमणे झाली. या मंदिराचे शेवटचे पुनर्निमाण डोगरा साम्राज्याचे संस्थापक आणि जम्मू-काश्मीरचे महाराजा गुलाब सिंह जामवाल यांनी १९ व्या शतकात केले होते. मागील ७ दशकांपासून हे मंदिर भग्नावस्थेत होते.
स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, या पिठामध्ये शारदादेवीच्या ३ शक्तींचा संगम आहे. यात पहिली शारदा (विद्येची देवी), दुसरी सरस्वती (ज्ञानाची देवी) आणि तिसरी वाग्देवी (वाणीची देवी) यांचा समावेश आहे.