गुढीपाडवा म्हणजे हिंदूंचा नववर्षारंभदिन आणि सृष्टीचा आरंभदिन ! या दिवशी ब्रह्मांडातील प्रजापति या देवतेच्या लहरी सर्वांत अधिक प्रमाणात पृथ्वीवर येतात. गुढीमुळे वातावरणातील प्रजापति लहरी कलशाच्या साहाय्याने घरात प्रवेश करतात. दुसर्या दिवसापासून या कलशात पाणी पिण्यासाठी घ्यावे. गुढीपूजन केल्याने प्रजापति लहरींचा लाभ पूजकास आणि त्याच्या कुटुंबियांस होतो. हिंदूंनी हा सण एकत्र येऊन साजरा केल्यास त्यातून हिंदूसंघटन आणि संस्कृती जतन होईल.
गुढी उभारण्याच्या वेळी करावयाची प्रतिज्ञा आणि प्रार्थना
शालीवाहन या राजाने शत्रूवर विजय मिळवला, शकांनी हुणांचा पराभव केला. त्यामुळे गुढीपाडवा हा हिंदूंच्या यशाचा आणि विजयोत्सवाचा दिवस आहे. या शुभमुहूर्ताच्या दिवशी केलेली प्रतिज्ञा (संकल्प) आणि प्रार्थना फलद्रूप होत असल्याने खाली दिल्याप्रमाणे प्रतिज्ञा अन् प्रार्थना करावी.
प्रतिज्ञा
१. आम्ही समस्त हिंदू गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर केवळ भारतातच नव्हे, तर पृथ्वीवर सर्वत्र हिंदु धर्म प्रस्थापित करून अखिल मानवजातीला सुसंस्कृत आणि सुख-समृद्धीयुक्त जीवन देण्याचा निश्चय करतो.
२. ‘नामजपादी धर्माचरण करून आणि राष्ट्र अन् धर्म यांचे रक्षण करून हिंदु धर्माची पताका संपूर्ण विश्वभर फडकवू’, अशी आम्ही ब्रह्मध्वजासमोर प्रतिज्ञा करतो.’
प्रार्थना
‘हे ब्रह्मदेवा आणि हे प्रतिपालक श्रीविष्णु, या गुढीच्या माध्यमातून वातावरणातील प्रजापति, सूर्य अन् सात्त्विक लहरी आमच्याकडून ग्रहण केल्या जाऊ देत. त्यांतून मिळणार्या शक्तीतील चैतन्य आमच्यामध्ये सातत्याने टिकू दे. आम्हाला मिळणार्या शक्तीचा वापर आमच्याकडून साधनेसाठी, गुरुसेवेसाठी, तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी केला जाऊ दे’, हीच आपल्या चरणी प्रार्थना !
गुढीपाडवा म्हणजे संकल्पशक्तीची मुहूर्तमेढ !
गुढीपाडवा हा हिंदूंचा महत्त्वाचा सण आहे. हिंदूंचे नववर्ष या दिवसापासून चालू होते. या दिवशी पृथ्वीतलावर ब्रह्मदेवाचे आणि श्रीविष्णूचे तत्त्व मोठ्या प्रमाणात कार्यरत असते. याच दिवशी प्रभु श्रीराम वनवास संपवून परत आले. प्रजाजनांनी त्यांचे स्वागत दारात गुढ्या उभारून केले. तेव्हापासून गुढी उभी करण्यात येते. या दिवशी प्रजापति लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. या लहरींच्या माध्यमातून प्रत्यक्ष ईश्वराचे तत्त्व कार्यरत असते. या दिवशी रामतत्त्व १०० पटींनी अधिक कार्यरत असते. गुढीच्या माध्यमातून कार्यरत असलेली ईश्वराची शक्ती जिवाला लाभदायक असते.
गुढीपाडवा खर्या अर्थाने साजरा कसा कराल ?
गुढीपाडवा म्हणजे नववर्षारंभदिन. आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस. श्रीरामाप्रती असलेल्या श्रद्धेपोटी या विजयगाथेचे आपण स्मरण करतो. या श्रद्धेचेच उघडउघड भंजन होत आहे. जेथे धर्महानी होते, तेथे ती वैध मार्गाने रोखण्याचा प्रयत्न करण्याचा निश्चय गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करा, तरच सण खर्या अर्थाने साजरा केल्यासारखे होईल !
गुढीपूजन सूर्योदयाच्या वेळी का करावे ?
सूर्योदयाच्या वेळी प्रक्षेपित होणारे चैतन्य पुष्कळ वेळ टिकणारे असल्यामुळे सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी. गुढीपाडव्याच्या दिवशी तेज आणि प्रजापति लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. सूर्योदयाच्या वेळी या लहरींतून प्रक्षेपित होणारे चैतन्य पुष्कळ वेळ टिकणारे असते. ते जिवाच्या पेशींत साठवून ठेवले जाते आणि आवश्यकतेनुसार त्या जिवाकडून ते वापरले जाते.
सूर्यास्तानंतर लगेचच गुढी उतरवावी !
ज्या भावाने गुढीची पूजा केली जाते, त्याच भावाने गुढी खाली उतरवली पाहिजे, तरच जिवाला तिच्यातील चैतन्य मिळते. गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून आणि प्रार्थना करून गुढी खाली उतरवावी. गुढीला घातलेले सर्व साहित्य दैनंदिन वापरातील वस्तूंच्या शेजारी ठेवावे. गुढीला अर्पण केलेली फुले आणि आंब्याची पाने यांचे वहात्या पाण्यात विसर्जन करावे. गुढी सूर्यास्तानंतर लगेचच खाली उतरवावी. सूर्यास्तानंतर १ ते २ घंट्यांंत वातावरणात अनिष्ट शक्ती कार्यरत होऊ लागतात. सूर्यास्तानंतरही गुढी उभी असल्यास त्यात अनिष्ट शक्ती प्रवेश करू शकतात. त्या शक्तींचा आपल्याला त्रास होऊ शकतो.
गुढीपाडव्याविषयी महाभारतातील उल्लेखमहाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंंद्राच्या आदरार्थ भूमीत रोवली आणि दुसर्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंंभीच्या दिवशी तिची पूजा केली. या परंंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून तिची पूजा करतात. महाभारतातच खिलपर्वात कृष्ण इंद्रकोपाची पर्वा न करता वार्षिक शक्रोत्सव (इंद्रोत्सव) बंद करण्याचा समादेश देतो. महाभारतातील आदिपर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे. (संदर्भ : विकीपिडिया संकेतस्थळ) |