बाळासाहेबांच्या विचारांशी विश्वासघात केल्याचा डाग पुसण्याचे काम आम्ही केले ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

खेड येथील विराट सभेत कोकणी माणूस बाळासाहेबांच्या विचारांच्या पाठीशी असल्याची ग्वाही !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रत्नागिरी – विरोधकांची आज आदळआपट चालू आहे. त्याला उत्तर देण्याची आवश्यकता नाही. या सभेने उत्तर दिलेले आहे. बाळासाहेबांनी तुमच्यावर, कोकणी माणसावर प्रेम केले आहे. त्या कोकणी माणसांनी तुम्हाला (उद्धव ठाकरे यांना) दाखवून दिले आहे की, तो आजही बाळासाहेबांच्या विचारांच्या पाठीशी आहे, धनुष्यबाणाच्या पाठीशी आहे. केवळ मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी विश्वासघात केल्याचा तुम्ही लावलेला डाग पुसण्याचे काम आम्ही केले, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

५ मार्च या दिवशी उद्धव ठाकरेंनी येथील सभेमधून शिंदे गटावर आणि भाजपवर टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा खेडमधल्या त्याच गोळीबार मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही सार्वजनिक सभा घेतली. या सभेला प्रचंड मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी उपस्थिती दर्शवली आहे. या सभेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,

१.  कोकणी माणूस फणसासारखा बाहेरून काटेरी दिसला, तरी आतून तो गोड आहे. कोकणचे आणि माझेही नाते आहे. माझी आईही कोकणातील आहे. आमचे घर जळले होते, तेव्हा गावकर्‍यांनी ते उभारून दिले होते.

२. सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांनी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या दावणीला बांधला.

. बाळासाहेब म्हणायचे ‘सत्ता येते सत्ता जाते; पैसा येतो, पैसा जातो; पण नाव गेले, तर ते परत मिळवता येत नाही.’

. आपल्याला शिवसेना मोठी करायची आहे, पुढे न्यायची आहे. बाळासाहेबांचे विचार पुढे न्यायचे आहेत. आपण त्यांचे वारसदार आहोत; म्हणून ते पुढे न्यायचे आहे. आता डाग लागू द्यायचा नाही, याची काळजी घ्यायची.

५. आम्ही गद्दारी केली नाही, तर वर्ष २०१९ मध्ये गद्दारी झाली.

६. याकूब मेमनच्या कबरीचे उदात्तीकरण केले, हीच खरी हिंदुत्वाशी बेईमानी आहे, गद्दारी आहे.

७. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केला, त्यावर तुम्ही काही बोलला नाहीत, मूग गिळून गप्प राहिलात. काँग्रेसचे नेते मणीशंकर अय्यर यांनी सावरकर यांचा अवमान केल्यावर बाळासाहेबांनी त्याच्या पुतळ्याला चपलेने झोडले होते. आता तुम्ही काँग्रेसवर काही बोलत नाही, हे कसले हिंदुत्व आहे ? सावरकरांचा अवमान आम्ही सहन करू शकत नाही.

८. ‘बाळासाहेब माझे वडील होते’ हे किती दिवस सांगणार ? बाळासाहेब आमचे दैवत होते. ‘वडील वडील’ करून त्यांना संकुचित करू नका. सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नका. महाराष्ट्रातील जनता तुम्हाला क्षमा करणार नाही.

९. ७० वर्षे जनतेचे लूट करणार्‍यांसमवेत तुम्ही आहात. तुम्ही ‘तुकडे तुकडे गँग’ समवेत आहात कि देशभक्तांसमवेत आहात ?

१०. देशावर घराणेशाही लादणार्‍यासमवेत तुम्ही आहात कि देशासाठी काम करणारे  देशभक्त मोदी यांच्या समवेत आहात ?

११. परदेशात देशाची अपकीर्त करणारे राहुल गांधी यांना पंतप्रधान करणार्‍यांसबेत तुम्ही जाणार आहात ?

१२. बाळासाहेबांचे राममंदिराचे स्वप्न कुणी साकार केले, त्यांच्यासमेवत जाण्याचा आम्ही  निर्णय घेतला.

१३. रामदास कदम यांनी कोकणात शिवसेना वाढवली; पण त्यांचेच आणि योगेश कदम यांचे राजकारण संपवायला ठाकरे निघाले, याचा साक्षीदार मी आहे.

१४.  धर्मवीर आनंद दिघे हे कारागृहात असतांना त्यांना साहाय्य करणारे बाळासाहेब होते; आणि आताचे ठाकरे कार्यकर्त्यांनाच संपवायला लागले आहेत. कार्यकर्त्यांना संपवून पक्ष मोठा होत नाही. ठाण्याचा भगवा उतरू नये; म्हणून मी बाहेर पडलो.

१५. राज ठाकरे यांनी काय मागितले होते ? नारायण राणे यांचा गुन्हा काय होता ?

१६. दरवाजा उघडाच ठेवा. सर्व बाहेर जातील ‘हम दो हमारे दोघेच’ रहातील.

१७. मी कालही कार्यकर्ता होतो, आजही आणि उद्याही राहीन.

आमच्यावरील अन्याय संपवण्यासाठीच वेगळे होण्याचा निर्णय ! – आमदार योगेश कदम

रत्नागिरी – उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख असतांना ते स्वत:च्याच पक्षातील आमदारांना संपवण्यासाठी निघाले होते, त्यामुळे आमच्यावरील अन्याय संपवण्यासाठीच आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला, असे वक्तव्य शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी केला आहे, ते खेड येथील सार्वजनिक सभेत बोलत होते.

आमदार योगेश कदम पुढे म्हणाले,

१. दापोली मतदारसंघातील भगवा खाली उतरवण्याचे धाडस कुणाकडे नाही, पुढच्या निवडणुकीत मीच आमदार असेन.

२. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी कोकणाच्या विकासासाठी कोणताही निधी दिलेला नाही.

३. कोकणात पूर आल्यानंतर उद्धव ठाकरे एकदाही कोकणात आले नाही; परंतु एकनाथ शिंदे यांनी कोकणातील पूरग्रस्तांसाठी २ कोटी रुपयांचे साहाय्य घोषित केले होते.

. उद्धव ठाकरेंनी आमच्या कुटुंबियांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला.

५. येथील विकासकामांसाठी मी अनेकदा उद्धव ठाकरेंना भेटण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी सहा महिने मला भेटण्याची वेळच दिली नाही.

६. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंचा उजवा हात म्हणून काम केले; मात्र त्यांच्या विरोधातच पक्षात राजकारण करण्यात आले.


परब यांच्या माध्यमातून आम्हाला संपवण्याचा प्रयत्न ! – शिवसेनेचे नेते रामदास कदम

शिवसेनेचे नेते रामदास कदम

रत्नागिरी – कोकणातील नेत्यांना बाजूला सारून अनिल परब यांना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले. परब यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला.

शिवसेनेचे नेते रामदास कदम पुढे म्हणाले,

१. उद्धव ठाकरेंनी मला धोका दिला. गाफिल ठेवले. उद्धव ठाकरे कटात नव्हते; पण गटात होते. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी केली.

२.आमच्या सभेत किती गर्दी आहे ? हे  विरोधकांनी लपून का होईना पहायला हवे.

२. वर्ष २००९ मध्ये मी दापोलीतून तिकीट मागितले; पण मला गुहागरमधून तिकीट देण्यात आले. उद्धव ठाकरेंनी धोका देऊन मला पराभूत केले.

३. शिवसेनेचे २० आमदार सूरतला गेले. त्याच वेळी गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडण्यास सांगितले; परंतु त्यांनी गुलाबरावांना मातोश्रीवरून हाकलून लावले.

४. नव्वद साली माझ्याविरोधात उमेदवार होता त्याला दाऊदची साथ होती पण मी डगमगलो नाही.

५. मिठाईचे खोके मी उद्धव ठाकरेंना दिले. एकनाथ शिंदेंनीही ठाकरेंना दिले. लाज वाटायला हवी, कुणाची हॉटेल्स सिंगापूर, लंडन, श्रीलंकेला आहेत, कुणाच्या मालमत्ता कुठे आहेत ? हे मी दाखवून दिल्याशिवाय रहाणार नाही. खोके वाटून तुमची उंची मराठवाड्यात आम्ही वाढवली. मरेपर्यंत डाग लागू देणार नाही.