सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करून गुरुकृपेने स्वतःमध्ये आमूलाग्र पालट झाल्याचे अनुभवणारे फोंडा, गोवा येथील श्री. मनोहर राऊत (वय ६२ वर्षे) !

या आधीच्या लेखात १८ मार्च या दिवशी आपण श्री. मनोहर राऊत यांनी मॉरिशस आणि फिजी येथे धर्मप्रसाराची सेवा करतांना अनुभवलेली गुरुकृपा यांविषयी जाणून घेतले. या लेखात त्यांना स्वतःतील स्वभावदोषांची झालेली जाणीव आणि ते अनुभवत असलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा यांविषयी जाणून घेऊया.

(भाग ३)

भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा ! – https://sanatanprabhat.org/marathi/663599.html

श्री. मनोहर राऊत

६. उत्तरदायी साधकांनी संत आणि साधक यांच्या समवेत प्रसारात जाऊन शिकायला सांगितल्यावर ‘सुटी वाया जाईल’, असा नकारात्मक विचार येणे

उत्तरदायी साधकांनी मला सद्गुरु राजेंद्र शिंदे, पू. (सौ.) संगीता जाधव आणि कु. माया पाटील यांच्या समवेत प्रचाराला जायला सांगितले. तेव्हा माझ्या मनात ‘मी धर्मप्रचार करण्यासाठी २ वर्षांची भरपगारी सुटी घेतली होती; पण मला आता यांच्या समवेत शिकायला पाठवले आहे. आता माझी भरपगारी सुटी वाया जाईल’, असा नकारात्मक विचार असायचा.

७. नकारात्मक विचारांमुळे अहं वाढणे आणि स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात जाणे

या सर्व विचारांमुळे माझा अहं वाढला. माझ्यावरील आवरण वाढले. उत्तरदायी साधकांनी मला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात जायला सांगितले. तेथे मी धर्मप्रचार करतांना माझ्याकडून झालेल्या चुकांची जाणीव एका संतांनी मला करून दिली. मला त्या चुका स्वीकारल्या जात नव्हत्या. तेव्हा माझ्या मनात विचार येत होते, ‘मी रात्रंदिवस एवढी मेहनत घेतली. मी पैशांचाही विचार केला नाही. याची काहीच किंमत नाही.’

८. ‘गुरुदेव साधकाला एकेक टप्पा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत’, याची साधकाला जाणीव नसणे आणि स्वतःतील अहंमुळे साधकाला अनेक गोष्टी स्वीकारता न येणे

गुरुदेवांची माझ्यावर कृपा असल्यामुळे ते प्रत्येक वेळी मला एकेक टप्पा पुढे नेण्याचा प्रयत्न करत होते; पण मी एवढा अहंकारी माणूस होतो की, ते करत असलेली कृपा माझ्या लक्षात यायची नाही. मी केवळ स्वतःचाच विचार करत होतो. मी काही दिवस स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवत असतांनाही माझ्यातील अहंमुळे मला अनेक गोष्टी स्वीकारता येत नव्हत्या. मला केवळ ‘माझ्या मनाप्रमाणे व्हावे’, असेच वाटायचे.’

९. देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी जाणे

९ अ. सात्त्विक उत्पादनांसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्याची सेवा करणे : माझी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात गेलो. तेथे मला सात्त्विक उत्पादनांसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्याचे दायित्व मिळाले. तेव्हाही माझ्या मनात ‘मीच ही खरेदी चांगली करू शकतो’, असा अहंकारयुक्त विचार असायचा. माझ्याकडून काही साधकांची मने दुखावली जायची.

९ आ. सद्गुरु राजेंद्र शिंदे आणि पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी आईप्रमाणे समजावून सांगणे : सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी माझ्या अहंकारी बोलण्याची आणि चुकांची मला जाणीव करून दिली. माझ्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यातही मला चुकांची जाणीव करून दिली जायची. आई जशी मुलाला घडवते, तसे सद्गुरु दादांनी मला घडवले. त्यांनी माझी मनःस्थिती जाणून माझी प्रत्येक चूक सांगून मला पुष्कळ साहाय्य केले. माझ्या अहंकारी स्वभावामुळे मी अनेक वेळा चूक स्वीकारत नसे; पण त्यांनी मला सांभाळून घेतले. पू. (सौ.) अश्विनी पवार यांनीही मला मार्गदर्शन केले. ‘साधक माझ्याविषयी खोटे सांगतात’, असे मला वाटायचे; पण सद्गुरु राजेंद्रदादा आणि पू. अश्विनीताई यांनी मला ‘माझे काय चुकते ?’, हे बघायला शिकवले. त्यामुळे माझ्यात पालट होत गेले.

१०. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली प्रीती

१० अ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने चुका सुधारण्यासाठी प्रयत्न होणे : तांब्याच्या भांड्यावर ठोके देऊन ते घडवतात, तसे गुरुमाऊलींनी मला घडवले. सद्यःस्थितीत मला गुरुमाऊलीच्या अथांग प्रीतीची जाणीव होऊ लागली आहे. ‘माझ्याकडून चुका झाल्या, तरी चुका सुधारण्यासाठी गुरुदेव माझ्याकडून प्रयत्न करून घेतात. ते माझ्यातील स्वभावदोष दूर करून मला त्यांच्या चरणांशी घेणार आहेत’, असा विचार करून माझ्याकडून प्रयत्न होत आहेत.

१० आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘मुलांना निरपेक्षपणे साधनेची दिशा द्या’, असे सांगणे आणि तेव्हापासून स्वतःतील अपेक्षा न्यून होणे : ‘माझ्या मुलांनी साधना करून जीवनाचे सार्थक करावे’, अशी माझी अपेक्षा असायची. ‘िशक्षण घेऊन कितीही पैसा मिळवला, तरी जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांत अडकलो, तर शिक्षणाचा काय उपयोग ?’, या विचाराने मी मुलांना साधना करण्याचा आग्रह करत असे. तेव्हा एकदा परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणाले, ‘‘तुम्ही मुलांचा विचार करू नका. ‘त्यांनी साधना करावी’, अशी अपेक्षा करण्यापेक्षा ‘देवाच्या कृपेने जे व्हायचे, ते होईलच’, असा विचार करा. तुम्ही त्यांना निरपेक्षपणे साधनेची दिशा द्या. शेष देवच करून घेईल.’’ तेव्हापासून माझ्यातील अपेक्षांचे प्रमाण न्यून झाले.

मुलांनी साधना करण्यास आरंभ केला, तेव्हा मला चांगले वाटले. नंतर माझ्या मनात ‘मुलांची प्रगती व्हावी’, असा विचार येऊ लागला. स्नेहलची (लहान मुलाची) आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित झाल्यावर ‘त्याच्या जीवनाचे कल्याण झाले’, असे मला वाटू लागले.

११. ‘गुरुविना या जगात आपले कुणीच नाही’, असा भाव सतत मनामध्ये असणे

मागील काही कालावधीत घरातील अडचणींमुळे मला निराशा येत होती. माझ्या मनात ‘माझ्याशी प्रेमाने वागणारे कुणीही नाही’, असा विचार असायचा. नंतर मी ‘गुरुदेवांची माझ्यावर कृपा आहे. साधक माझ्याशी प्रेमाने वागतात. सद्गुरु राजेंद्रदादा आणि पू. अश्विनीताई नेहमी मला आई-वडिलांप्रमाणेच प्रेम देतात’, असे विचार केल्यामुळे माझी त्याविषयीची खंत हळूहळू न्यून झाली. आता माझ्या मनात ‘गुरुविना माझे या जगात कुणीच नाही. गुरुच माझे माता, पिता आणि बंधु आहेत. त्यांच्या कृपेने माझ्या सर्व अडचणी दूर होणार आहेत. तेच मला मोक्षापर्यंत घेऊन जाणार आहेत’, हाच भाव असतो.

१२. कृतज्ञता

‘आज जे घडत आहे, ते सर्व गुरुमाऊलींच्याच कृपेने घडत आहे’, अशी माझ्या मनात श्रद्धा निर्माण झाली आहे. एके काळी मला दारू प्यायचे व्यसन असतांना माझे भाऊ आणि नातेवाईक मला म्हणाले होते, ‘‘तू या दारूमध्येच मरणार आहेस.’’ ‘गुरुमाऊलींनी मला त्यातून बाहेर काढले आणि साधनामार्गावर आणले. गुरुमाऊली हेच माझे कुलदैवत आहेत. त्यांनीच माझ्या जीवनाचा उद्धार केला आहे’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

(समाप्त)

– श्री. मनोहर राऊत (वय ६२ वर्षे), फोंडा, गोवा. (१६.१.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक