सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करून गुरुकृपेने स्वतःमध्ये आमूलाग्र पालट झाल्याचे अनुभवणारे फोंडा, गोवा येथील श्री. मनोहर राऊत (वय ६२ वर्षे) !

फाल्गुन कृष्ण दशमी (१७.३.२०२३) या दिवशी श्री. मनोहर राऊत यांचा ६२ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याच्या साधनाप्रवासात आपण १७ मार्च या दिवशी त्यांचा सनातन संस्थेची झालेला संपर्क आणि त्यांनी केलेला सेवेला आरंभ हा भाग पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.

(भाग २)

भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा !https://sanatanprabhat.org/marathi/663399.html


सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘श्री. मनोहर राऊत यांना साधनेत येण्यापूर्वी अनेक अयोग्य सवयी होत्या. त्यांना त्यांच्या एका मित्राकडून सनातन संस्था सांगत असलेल्या साधनेविषयी समजले. श्री. मनोहर राऊत यांनी लगेच नामजप करणे, सत्संगाला जाणे आणि सेवा करणे आदी गोष्टी चालू केल्या. ते पहिल्या सत्संगाला गेल्यानंतर ८ दिवसांतच त्यांच्या अयोग्य सवयी दूर झाल्या. यांतून सत्संग आणि सत्संगात सांगितलेल्या गोष्टी त्वरित कृतीत आणणे, यांचे महत्त्व अधोरेखित होते. श्री. मनोहर राऊत यांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रियाही प्रामाणिकपणे राबवली.

‘व्यक्तीने योग्य साधना केल्यावर तिच्यात कसा पालट होतो !’, याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री. मनोहर राऊत ! त्यांच्यातील ‘आज्ञापालन करणे आणि सेवेची तळमळ’, या गुणांमुळे ते कौतुकास पात्र आहेत. ‘त्यांची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होवो’, ही ईश्वरचरणी प्रार्थना !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (१६.३.२०२३)


४. मॉरिशस येथे धर्मप्रचार करण्याची संधी मिळणे

श्री. मनोहर राऊत

४ अ. मित्रांसमवेत मॉरिशस येथे गेल्यावर धर्मप्रचार करणे : आम्ही काही मित्र मिळून मॉरिशस येथे गेलो होतो. आम्ही सर्वांनी मिळून ‘मॉरिशस येथे धर्मप्रचार करुया’, असे ठरवले. त्यानुसार काही दिवस आम्ही धर्मप्रचार करण्याचा सरावही केला. आम्ही धर्मप्रचार करून पुन्हा घरी परतल्यावर मी सर्वांना सांगितले,‘‘आपण आता मॉरिशसला जाऊन आलो; पण आपल्याला तेथे पुन्हा जावे लागेल.’’

४ आ. पत्नीसह मॉरिशस येथे गेलो असता तेथे एका अनोळखी व्यक्तीने रहाण्यासाठी जागा देणे : मी पत्नीसह (सौ. अंजलीसह) मॉरिशस येथे जाण्याचे ठरवले. मी माझ्या मित्राला ‘तेथे गेल्यावर कुठे रहायचे ?’, याविषयी विचारून घेतले अन् आम्ही (पती-पत्नी) मॉरिशस येथे धर्मप्रचार करायचे ठरवले तेथे गेल्यावर ज्या व्यक्तीच्या घरी आम्हाला रहायला सांगितले होते, त्या व्यक्तीला आम्ही अनेक वेळा भ्रमणभाष केला; पण त्या व्यक्तीने भ्रमणभाष घेतला नाही. आम्ही विमानतळावरून ‘टॅक्सी’ करून त्या ठिकाणी गेलो़. तेथे गेल्यावर आम्हाला त्या व्यक्तीचे घर बंद दिसले. मग आम्ही मार्गाच्या बाजूला उभे राहिलो. तेव्हा एका घरातील मराठी माणसाने आमची चौकशी केली. आम्ही त्यांना ‘येथे धर्मप्रचार करण्यासाठी आलो आहोत’, असे सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘छान आहे. तुम्ही माझ्या घरी राहू शकता.’’

४ इ. मॉरिशस येथे अनेकांना साधनेविषयी सांगणे : नंतर त्या व्यक्तीने आम्हाला अनेक देवळांमध्ये नेले. आम्ही देवळांमध्ये आरतीच्या वेळी जात होतो. तेव्हा तेथील लोक आमचा विषय ऐकून घेण्यास उत्सुक असायचे. ते म्हणायचे, ‘‘ही माणसे देवाविषयी सांगत आहेत, तर यांना आता इथेच राहू दे.’’ आम्ही तेथे एक मास राहिलो.

४ ई. ‘सनातन धर्म फेडरेशन’च्या अध्यक्षांनी ‘मंदिरांमध्ये प्रचार करू शकता’, असे सांगणे : आम्ही मॉरिशसला आलो असतांना आम्हाला जे जिज्ञासू भेटले होते, त्यांतील एका जिज्ञासूशी आमची पुन्हा भेट झाली. त्यांनी आम्हाला ‘आमच्याकडे रहायला येऊ शकता’, असे सांगितले. एका व्यक्तीने आम्हाला ‘सनातन धर्म फेडरेशन’च्या अध्यक्षांकडे नेले. ते ४० मंदिरांचे अध्यक्ष होते. त्यांनी सांगितले, ‘‘तुम्ही हिंदु धर्माचा प्रचार करत आहात, तर मंदिरांमध्ये प्रचार करू शकता.’’

४ उ. मंदिरांमध्ये आलेल्या जिज्ञासूंना श्री गणेशमूर्तीला प्रदक्षिणा घालायला सांगणे आणि जिज्ञासूंना अनुभूती येणे : आम्हाला ज्या व्यक्तीने बोलावले होते, त्यांच्याकडे आम्ही रहायला गेलो. तेथे आम्ही ६ ते ८ दिवस राहिलो. त्या कालावधीत आम्ही प्रतिदिन ‘सनातन धर्म फेडरेशन’च्या मंदिरांमध्ये जे जिज्ञासू यायचे, त्यांना साधनेविषयी सांगत होतो. आम्ही जिज्ञासूंना सात्त्विक श्री गणेशमूर्तीला प्रदक्षिणा घालायला सांगितले. जिज्ञासूंनी श्री गणेशमूर्तीला प्रदक्षिणा घातल्यावर त्यांना अनुभूती आल्या. आम्ही मंदिरामध्ये गेल्यावर जिज्ञासू आमच्याजवळ येत. हे त्या मंदिराच्या विश्वस्तांना आवडले नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला एका संध्याकाळी बोलावले आणि सांगितले, ‘‘उद्याच्या उद्या तुम्ही निघून जा.’’ त्या वेळी मला पुष्कळ ताण आला. नंतर दुसर्‍या दिवशी त्याच व्यक्तीने मला सम्राट नावाच्या शिक्षकाकडे नेले.

४ ऊ. पूर्णानंद स्वामी यांची भेट झाल्यावर त्यांनी आमचे कौतुक करणे : दुसर्‍या दिवशी ते आम्हाला पूर्णानंद स्वामी यांच्या आश्रमात घेऊन गेले. पूर्णानंद स्वामींच्या आश्रमात गेल्यावर आम्ही त्यांना नमस्कार केला. पूर्णानंद स्वामींनी आमच्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाले, ‘‘अहो, आम्ही तुमचीच वाट पहात होतो. तुमच्यासारखे धर्मप्रेमी आणि धर्मप्रचार करणारे आम्हाला मॉरिशसमध्ये हवे आहेत.’’ आम्हाला पूर्णानंद स्वामींच्या आश्रमात ज्या दोन व्यक्तींनी पोचवले, त्यांना पूर्णानंद स्वामी म्हणाले, ‘‘अरे तुम्ही साधुसंतांचा आदर करत नाही. ‘तुम्हाला देव आपल्या घरी आला आहे’, हे ठाऊक नाही. तुम्ही देवाला हाकलून देत आहात, म्हणजे तुमचे नशीब कसे असेल ?, हे मी सांगू शकत नाही. तेव्हापासून आम्ही पूर्णानंद स्वामींच्या आश्रमामध्ये राहू लागलो. अनेक वर्षे आम्ही मॉरिशस येथे येत होतो.

५. फिजी येथे धर्मप्रचार करण्याची संधी मिळणे

नंतर आम्ही (मी आणि माझा मुलगा श्री. स्नेहल) फिजी येथे गेलो होतो. मी फिजी येथे दुसर्‍या वेळी गेलो, तेव्हा मी ३ मासांचा ‘व्हिसा’ घेतला होता. तेथे धर्मप्रचार करतांना अधिक दिवस रहायचे असेल, तर ‘१५० रुपये भरून ‘व्हिसा’ वाढवता येतो’, अशीही माहिती मला मिळाली होती. (‘व्हिसा’- विदेशात रहाण्यासाठी त्या देशाचा अधिकृत परवाना)

५ अ. दूरदर्शनवरील एका वाहिनीच्या प्रवक्त्यांनी आमची मुलाखत घेणे : आम्ही दूरदर्शनवर कार्यक्रम दाखवणार्‍या एका वाहिनीच्या प्रमुखांकडे गेलो. तेव्हा माझी त्यांच्याशी ओळख नसतांनाही ते मला म्हणाले, ‘‘मी तुमची वाटच पहात होतो. तुम्ही धर्मप्रचारक आहात ना ? तुम्ही आमच्या वाहिनीवर प्रवचन द्याल का ?’’ त्या वाहिनीवर केवळ १५ मिनिटेच ‘हिंदु धर्म किंवा साधना’ या विषयांवर बोलण्याची अनुमती होती. वेळ मर्यादित असल्यामुळे त्या वाहिनीच्या प्रवक्त्यांनी माझी मुलाखत घेतली.

५ आ. आईचे निधन झाल्यावर घरी जाण्यापेक्षा सेवेला महत्त्व देणे : आम्ही फिजी येथे रहात असतांना माझी आई रुग्णाईत असल्याचे मला भ्रमणभाष करून कळवण्यात आले. तेव्हा ‘ती देवाच्या कृपेने बरी होईल’, असे मला वाटले. नंतर काही दिवसांनी आईचे निधन झाल्याचे समजले. तेव्हा ‘मला तेथे पोचण्यास ३ दिवस लागतील. त्यापेक्षा आपण येथेच धर्मप्रचाराची सेवा केली, तर देवाच्या कृपेने आईच्या आत्म्याला शांती मिळू शकते’, असा विचार मी केला. माझा ‘व्हिसा’ संपल्यावर मी घरी गेलो. त्यानंतर मला गावातील लोक पुष्कळ बोलले; परंतु मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.

माझा ‘व्हिसा’ संपल्यावर मी भारतात आलो.’ (क्रमशः)

– श्री. मनोहर राऊत (वय ६२ वर्षे), फोंडा, गोवा. (१६.१.२०२३)

भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा ! – https://sanatanprabhat.org/marathi/664214.html