पी.एम्.पी.एम्.एल्.ने पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे पालकमंत्र्यांसमवेत बैठक !

पी.एम्.पी.एम्.एल्.च्या ठेकेदारांनी अचानक संप पुकारला

पुणे – पुणे शहर हे देशातील सर्वात जलदगतीने विकसित होणारे, तसेच वास्तव्यासाठीही सर्वाधिक पसंतीचे आहे. शहराची लोकसंख्या पहाता सर्वाधिक पुणेकर पी.एम्.पी.एम्.एल्.च्या बसमधून प्रवास करतात; मात्र पी.एम्.पी.एम्.एल्.च्या ठेकेदारांचे गेल्या ३ मासांचे देयक न मिळाल्याने काही दिवसांपूर्वी पी.एम्.पी.एम्.एल्.च्या ठेकेदारांनी अचानक संप पुकारला होता. या संपाचा विद्यार्थी, नोकरदार यांसह प्रवाशांना फटका बसला; मात्र पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मध्यस्ती करून तातडीने हा संप मिटवला, तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील प्रमुख असलेल्या पी.एम्.पी.एम्.एल्.ची वाहतूक व्यवस्था भविष्यात खंडित होणार नाही, याची पी.एम्.पी.एम्.एल्. प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पी.एम्.पी.एम्.एल्.च्या ४ ठेकेदारांकडून काही दिवसांपूर्वी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांच्या निवासस्थानी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासन, पी.एम्.पी.एम्.एल्. प्रशासन आणि ठेकेदार यांसमवेत बैठक घेण्यात आली.

१. या वेळी पी.एम्.पी.एम्.एल्.कडून ठेकेदारांना ६६ कोटी रुपये देण्यात आले. जानेवारीपर्यंतची तूट मार्च अखेरपर्यंत द्यावी, तसेच फेब्रुवारी आणि मार्चचे देयक १५ एप्रिलपर्यंत द्यावे.

२. भविष्यात पी.एम्.पी.एम्.एल्.कडून दर मासाला देयक दिले जाईल याची दक्षता घेण्याविषयी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पी.एम्.पी.एम्.एल्.चे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना सूचना दिल्या.

 

३. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी संबंधित सर्वांनीच संवेदनशीलता दाखवावी आणि बससेवा अखंडित अन् सुरळीत राहील याविषयी आवश्यक नियोजन करावे. प्रवाशांना चांगली सेवा मिळेल यासाठी आवश्यक उपाय करावेत, असे निर्देशही पाटील यांनी दिले.

या बैठकीला आमदार सिद्धार्थ शिरोळे, पी.एम्.पी.एम्.एल्.चे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, पुणे महापालिका आयुक्त डॉ. विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त शेखर सिंह, पी.एम्.आर्.डी.ए.चे आयुक्त राहुल रंजन महिवाल, पालकमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी राजेंद्र मुठे यांच्यासह पी.एम्.पी.एम्.एल्.चे प्रमुख ठेकेदार उपस्थित होते.