पुणे येथील रुबी हॉल रुग्णालयातील किडनी रॅकेट चौकशीसाठी समिती स्थापन !
मुंबई, १८ मार्च (वार्ता.) – राज्यातील धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारीतील रुग्णालयांमध्ये विनामूल्य किंवा ५० टक्के सवलतीच्या दरात गरीब आणि अल्प उत्पन्न असणार्या नागरिकांवर करण्यात येणार्या उपचारांची अनियमितता पडताळण्यासाठी लेखा परीक्षकांच्या वतीने परीक्षण करण्यात येईल. यामध्ये अनियमितता आढळणार्या म्हणजे गरीब रुग्णांना सवलत न देणार्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी १८ मार्च या दिवशी विधानसभेत केली. याविषयी भाजपच्या सदस्या सौ. माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत हा तारांकित प्रश्न विचारला होता. त्याला ते उत्तर देत होते.
(सौजन्य : Lokshahi Marathi)
किडनी रॅकेट प्रकरणी आपल्या मागणीवरून समितीची स्थापना !
रुबी हॉल क्लिनिक येथील किडनी तस्करी प्रकरणात १५ जणांवर गुन्हा दाखल झाला होता, मात्र मा. उच्च न्यायालयात हे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे आणि या प्रकरणाचा खरा सूत्रधार अजूनही फरार आहे.
(१/३) pic.twitter.com/RsuKD0vdf3
— Madhuri Misal (@madhurimisal) March 17, 2023
‘रुबी हॉल रुग्णालयातील किडनी रॅकेटमधील मुख्य आरोपी पसार आहेत. ही संघटित गुन्हेगारी असून या रॅकेटचे लोण महाराष्ट्रात पसरले आहे’, असे सौ. मिसाळ यांनी निदर्शनास आणून दिले. त्याला उत्तर देतांना डॉ. तानाजी सावंत म्हणाले की, रुबी हॉल रुग्णालयामध्ये किडनी रॅकेटची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली शासकीय आणि अशासकीय सदस्यांची समिती नेमून ३ मासांत याविषयी अहवाल सादर करण्यात येईल.