खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंह याला अटक !

१० साथीदारांनाही शस्त्रास्रांसह अटक !

खालिस्तान समर्थक अमृतपाल सिंह

अमृतसर – खलिस्तान समर्थक आणि ‘वारिस पंजाब दे’ (पंजाबचे वारसदार) या संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह याला त्याच्या ६ साथीदारांसह जालंधर येथील नकोदरा भागातून पंजाब पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे हस्तगत करण्यात आली आहे. अजनाला पोलीस ठाण्यावरील घेरावाच्या संदर्भातील आरोपावरून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या अटकेनंतर राज्यातील इंटरनेट सेवा २४ घंट्यांसाठी बंद करण्यात आली आहे. तसेच राज्यात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अमृतपाल याला अज्ञात ठिकाणी नेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडू नये, यासाठी पोलिसांनी असे केल्याचे म्हटले जात आहेत. पोलिसांनी अमृतपाल यांच्या आणखी ४ जणांना अटक केल्याचेही सांगण्यात येत आहे.

१. अमृतपाल सिंह याच्याविरुद्ध ३ गुन्हे नोंद आहेत. यांतील २ गुन्हे हे अजनाला पोलीस ठाण्यात नोंद आहेत. अमृतपाल सिंह हा १८ मार्चला शाहकोट मलसिया येथे एका कार्यक्रमासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी रस्त्यातच अमृतपाल याच्या गाड्यांच्या ताफ्याला घेरले. त्या वेळी अमृतपाल तेथून पळून गेला, तर त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी १०० गाड्यासह अमृतपाल याचा दीड घंटे पाठलाग केला आणि त्याला नकोदरा भागात अटक केली.

२. पोलिसांनी अमृतपाल याचा जवळचा सहकारी भगवंत सिंह उपाख्य बाजेके याला त्याच्या मोगा येथील शेतामध्ये जाऊन अटक केली.

(म्हणे) ‘शिखांना गुलाम बनवण्यात आले आहे !’ – अमृतपाल सिंह

अटकेनंतर वृत्तवाहिन्यांशी बोलतांना अमृतपाल सिंह म्हणाला की, पोलिसांनी मला पकडण्यासाठी सर्व शक्ती लावली. मी जालंधरला कीर्तनासाठी जात असतांना अटक करण्यात आली. शिखांना गुलाम बनवण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

  • अमृतपाल याला अटक करणे हा पहिला टप्पा आहे. त्याला जामीन मिळू नये आणि त्याच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्याला कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे हा दुसरा टप्पा असला पाहिजे. तसेच त्याला पंजाबमधील कारागृहात न ठेवता ईशान्य भारतात किंवा दक्षिण भारतात कारागृहात ठेवले पाहिजे ! त्याच्या संघटनेवर बंदी घातली पाहिजे.
  • खलिस्तानची चळवळ चिरडण्यासाठी आता यावर न थांबता पंजाब, देशातील अन्य भागांतील आणि विदेशातील खलिस्तानांच्या विरोधात कारवाईसाठी प्रयत्न होणे आवश्यक !