श्री महालक्ष्मीदेवीच्‍या मंदिरात प्रसारमाध्‍यमांना छायाचित्रक घेऊन येण्‍यास जिल्‍हाधिकार्‍यांकडून बंदी !

कोल्‍हापूर – करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरात वार्तांकनासाठी जाणार्‍या प्रसारमाध्‍यमांच्‍या प्रतिनिधींना छायाचित्रक (कॅमेरा) घेऊन आत जाण्‍यास बंदी घालण्‍यात आली आहे. १६ मार्च या दिवशी श्री महालक्ष्मी मंदिराच्‍या प्रवेशद्वारावरच माध्‍यमांच्‍या प्रतिनिधींना अडवण्‍यात आले. जिल्‍हाधिकारी राहुल रेखावार यांनी तसा आदेश काढल्‍याचे पश्‍चिम महाराष्‍ट्र देवस्‍थान व्‍यवस्‍थापन समितीने म्‍हटले आहे.

कोल्‍हापूर येथील प्रसारमाध्‍यमांनी श्री महालक्ष्मीच्‍या मूर्तीची स्‍थिती नाजूक असल्‍याचे समोर आणले होते. ‘देवीच्‍या मुखावरील भाव पालटले आहेत’, असे वृत्तात नमूद करण्‍यात आले होते. यानंतर पहिल्‍यांदा राज्‍य पुरातत्‍व आणि नंतर केंद्रीय पुरातत्‍व विभागाकडून पहाणी करण्‍यात आली. केंद्रीय पुरातत्‍व विभागाकडून पहाणी करतांना मूर्तीच्‍या मुखावरील लेप काढल्‍याचा आरोप श्रीपूजकांच्‍या अधिवक्‍त्‍यांनी न्‍यायालयात केला आहे. लेपाचा काही थर काढून टाकल्‍यानंतर मूर्तीचा चेहरा आणखी खराब झाल्‍याचे म्‍हटले आहे. या संदर्भात देवीच्‍या मूर्तीची दोन छायाचित्रे कोल्‍हापूर जिल्‍हा सत्र न्‍यायालयात सादर करण्‍यात आली आहेत. जिल्‍हाधिकार्‍यांनी मात्र ‘टी.आर्.पी.’साठी बातम्‍या दाखवल्‍या जात आहेत’, असा आरोप केला आहे.

संपादकीय भूमिका

श्री महालक्ष्मीदेवीच्‍या मूर्तीच्‍या संदर्भातील वस्‍तूस्‍थिती प्रशासनाने जनतेसमोर आणावी, अशीच देवीभक्‍तांची मागणी आहे !