पाकिस्तानातून आलेल्या २२ हिंदूंना मध्यप्रदेशमध्ये तात्पुरते रहाण्याची अनुमती !

पाकिस्तानातून आलेल्या २२ हिंदूंसमवेत इंदूरचे खासदार शंकर लालवानी

इंदूर – पाकिस्तानातील मुलतान येथून हरिद्वार येथे स्वतःच्या पूर्वजांच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी आलेल्या दोन हिंदु कुटुंबांतील २२ सदस्यांना भारतात रहाण्याची अनुमती देण्यात आली आहे. या सर्व निर्वासितांना मध्यप्रदेशमधील धार जिल्ह्यात रहाण्यासाठी जागा देण्यात आली आहे.

२२ हिंदु निर्वासितांचा हा गट तात्पुरत्या व्हिसावर भारतात आला होता. त्यांनी इंदूरचे खासदार शंकर लालवानी यांच्याशी संपर्क साधला आणि पाकिस्तानमधील छळाचा संदर्भ देत भारतात रहाण्याची इच्छा व्यक्त केली. खासदारांनी गृह मंत्रालयाशी चर्चा करून हिंदु निर्वासितांना भारतात रहाण्याची अनुमती मिळवून देण्यासाठी सहकार्य केले. खासदार लालवानी यांनी सांगितले की, सर्वांना तात्पुरत्या स्वरूपात भारतात रहाण्याची अनुमती देण्यात आली आहे. पुढे ते दीर्घकालीन व्हिसासाठी अर्ज करतील, त्यानंतर ते भारतात राहू शकतील. खासदार लालवानी म्हणाले की, पाकिस्तानमध्ये हिंदू असुरक्षित आहेत. तेथे हिंदूंवर अनेक प्रकारचे अत्याचार होत आहेत.