पुणे येथील २ अधिकोषांवर रिझर्व्‍ह बँकेचे आर्थिक निर्बंध !

पुणे – थकबाकीचे प्रमाण वाढल्‍याने रिझर्व्‍ह बँकेने ‘डिफेन्‍स अकाऊंट्‌स को-ऑपरेटिव्‍ह बँक’ आणि ‘पुणे सहकारी बॅँक लिमिटेड’ या दोन्‍हींवर आर्थिक निर्बंध लागू केले आहेत. त्‍यामुळे या २ अधिकोषांना नवीन कर्जवाटप, ठेवी स्‍वीकारणे अथवा कोणत्‍याही कर्जाचे नूतनीकरण, तसेच मालमत्तेची विक्री अथवा हस्‍तांतर करण्‍यास मनाई केली आहे. अतीतातडीच्‍या कारणांसाठी पुणे सहकारी बँकेतील खातेदार-ठेवीदार यांना अधिकाधिक १० सहस्र, तर डिफेन्‍स अकाऊंट्‌स को-ऑपरेटिव्‍ह बँकेतील खातेदार-ठेवीदारांना ३० सहस्र रुपयांपर्यंतची रक्‍कम काढता येणार आहे. ‘रिझर्व्‍ह बँक ऑफ इंडिया’चे मुख्‍य सरव्‍यवस्‍थापक योगेश दयाल यांनी १० मार्च या दिवशी या विषयीचे आदेश काढले आहेत. पुढील ६ मासांपर्यंत या दोन्‍ही अधिकोषांवर निर्बंध रहाणार असून या कालावधीत आर्थिक परिस्‍थिती सुधारल्‍यास या निर्णयावर पुनर्विचार होऊ शकतो, असे आदेशात म्‍हटले आहे.