छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील पैठण येथील नाथ मंदिराबाहेर श्री संत एकनाथ महाराज विश्वस्त मंडळाच्या सार्वजनिकरित्या दहीहंडी फोडण्याच्या निर्णयाविरोधात नाथवंशजांकडून प्रविष्ट करण्यात आलेली फौजदारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने १४ मार्च या दिवशी फेटाळली.
पैठण येथे सध्या नाथषष्ठीचा उत्सव चालू असून १५ मार्च या दिवशी लाखो वारकर्यांच्या उपस्थितीत सार्वजनिकरीत्या आणि मंदिरातही नाथवंशजांकडून दहीहंडी फोडण्यात येते. या प्रकरणी नाथवंशजांच्या वतीने मधुसूदन रघुनाथराव गोसावी यांनी अॅड्. तुंगार यांच्या वतीने याचिका प्रविष्ट केली होती. नाथवंशजांकडून ‘सार्वजनिकरित्या दहीहंडी फोडण्याविरोधात मनाई हुकूम काढावा’, अशी विनंती करणारी याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. दहीहंडी फोडण्याच्या संदर्भाने जुनाच वाद आहे. विश्वस्तांकडून आयोजित दहीहंडी फोडण्याचा उत्सव हा ६ लाख वारकर्यांच्या उपस्थितीत पार पडतो.