पाकमधील सिंध प्रांतात हिंदूंना पाणीपुरवठा करण्यास नकार !

हिंदु समाजातील लोकांना गावातून हाकलले !

गावातील हिंदूंचा पोलीस ठाण्याच्या परिसरात आश्रय

थारपरकार – सिंध प्रांतातील थारपरकार जिल्ह्यातील छापर खोसो गावातील हिंदु मेघावर समुदायातील लोकांना पाणीपुरवठा करण्यास नकार देण्यात आला. त्यासह या समाजातील लोकांना गावातील राजू खोसो, सिकंदर खोसो आणि अन्य मुसलमान यांनी गावातून हाकलून दिले. यामुळे गावातील मेघावर समाजातील हिंदूंनी पोलीस ठाण्याच्या परिसरात आश्रय घेतला आहे. या लोकांनी मुसलमानांच्या विरोधात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही.

थारपरकार जिल्हा हा भारत-पाकिस्तान सीमेवर आहे. हा जिल्हा पाकमधील मागास जिल्ह्यांपैकी एक आहे. येथे रहात असलेल्या अल्पसंख्य हिंदूंच्या समस्यांकडे सरकार, प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून दुर्लक्ष केले जाते. या परिसरात हिंदूंमधील मेघावर, भील आणि जोगी या समुदायांचे लोक रहातात. हा वाळवंट प्रदेश आहे. येथे हिंदूंचे अपहरण, हिंदु मुलींचे धर्मांतर, तरुणांच्या आत्महत्या असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात.

संपादकीय भूमिका

पाकमधील असुरक्षित हिंदू ! भारतातील अल्पसंख्यांकांवर कथित अन्याय झाल्यावर आकाश-पाताळ एक करणार्‍या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांना आता हिंदूंना पाण्यासारख्या मूलभूत गरजाही न पुवरणार्‍या पाकचा हा अमानवीपणा दिसत नाही का ? कि त्याकडे ते सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात ? भारताने पाकसह अशा संस्थांनाही याविषयी खडसावले पाहिजे !