बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या दरबारात आलेल्या महिलेच्या पतीच्या मृत्यूचे गूढ उलगडणार !

  • ४ वर्षांपूर्वी पतीने केली होती आत्महत्या; मात्र पत्नीला संशय हत्येचा !

  • गूढ उलगडेपर्यंत केस न धुण्याची केली आहे प्रतिज्ञा !

पीडित महिला (डावीकडे) बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री (उजवीकडे)

छतरपूर (मध्यप्रदेश) – बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या दरबारात आलेल्या एका महिलेने तिच्या पतीने आत्महत्या केली नसून त्यांची हत्या झाली आहे; मात्र हे कुणीच मान्य करत नाही. जोपर्यंत पतीच्या मृत्यूचे गुढ उकलत नाही, तोपर्यंत केस धुणार नाही, अशी प्रतिज्ञा केल्याचे सांगितले. ४ वर्षांपूर्वी या महिलेच्या पतीने आत्महत्या केली होती. ही महिला पंडितजींच्या दरबारात आली, तेव्हाच पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी तिने काहीही न सांगताही ती तिच्या पतीच्या मृत्यूविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आल्याचे सांगून सर्वांना आश्‍चर्यचकीत केले. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.

सौजन्य: Santon Ki Vani

१. या व्हिडिओमध्ये पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री म्हणतात, ‘या दरबारात उपस्थित असणार्‍यांपैकी एक महिला पतीच्या मृत्यूविषयीचे गूढ जाणण्यासाठी आली आहे. समेवत पतीचे छायाचित्र आणले आहे. त्या महिलेने व्यासपिठावर यावे.’ या आवाहनानंतर एक महिला उठून व्यासपिठावर आली.

२. पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री तिला त्यांनी तिच्याविषयी लिहिलेल्या माहितीचा कागद दाखवतात आणि सांगतात की, तुमच्या पतीच्या मृत्यूचे गूढ जाणण्यासाठी आला आहात. त्यांची हत्या झालेली आहे; मात्र त्याला आत्महत्या दाखवण्यात आले आहे. शत्रू मोकाट फिरत आहेत. तुमच्यावर दबाव निर्माण करण्यात आला आहे. तुम्ही प्रतिज्ञा केली आहे की, जोपर्यंत याविषयीचे गूढ उकलणार नाही आणि गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी होणार नाहीत, तोपर्यंत केस धुणार नाही.

३. यावर महिलेने ‘जे कागदावर लिहिले आहे, ते सर्व सत्य आहे’, असे सांगितले. त्यावर पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री म्हणाले की, लवकरच गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी होईल आणि योग्य ते समोर येईल. तुम्ही केस धुवू नका. श्री हनुमानाला वाटले, तर लवकरच तुमचे केस धुतले जातील.