चर्चमधील पाद्रयांनी विवाह करण्यास कोणतीही अडचण नाही ! – पोप फ्रान्सिस

पाद्रयांसाठी बनवण्यात आलेल्या ११ व्या शतकातील नियमांत पालट करण्याचे सुतोवाच !

पोप फ्रान्सिस

व्हॅटिकन सिटी – ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी चर्चमधील पाद्रयांसाठी बनवण्यात आलेला शारीरिक संबंधांवरील बंदीचा नियम आता अस्थायी ठरवला आहे. त्यांच्या मते चर्चमधील पाद्रयांनी विवाह करण्यास कोणतीही अडचण नाही. या संदर्भातील वृत्त ‘डेली मेल’ या इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केले आहे. अर्जेंटिनातील दैनिक ‘इंफोबे’ ला दिलेल्या मुलाखतीत पोप यांनी याविषयी विधान केल्याचे या वृत्तात म्हटले आहे. या मुलाखतीत पोप यांना जर्मनीतील कॅथॉलिक चर्चकडून समलैंगिक विवाहांना देण्यात आलेली अनुमती आणि चर्चमध्ये मुलांचे होणारे लैंगिक शोषण यांविषयी प्रश्‍न विचारण्यात आले होते.

१. पोप फ्रान्सिस यांनी म्हटले की, पाद्रयांना शारीरिक संबंध ठेवण्याच्या संदर्भातील चर्चच्या जुन्या नियमांची समीक्षा केली जाईल. चर्चमधील नियमांच्या पालटाविषयी होणार्‍या चर्चेचे जनतेने स्वागत करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. चर्चच्या पाद्रयांकडून लहान मुलांच्या होत असलेल्या लैंगिक शोषणाच्या पार्श्‍वभूमीवर पोप यांच्याकडून नियमात पालट केला जात असल्याचे सांगितले जात आहे.

२. पोप यांनी सांगितले की, ११ व्या शतकात रोमन कॅथॉलिक चर्चेकडून पाद्रयांसाठी बनवण्यात आलेले नियम अनंत काळासाठी बनवण्यात आलेले नाहीत. ते त्या वेळेची आर्थिक आवश्यकता लक्षात घेऊन बनवण्यात आले होते. शारीरिक संबंधांवर बंदी हा एक शिस्तीचा भाग आहे. त्या वेळी विचार होता की, पाद्रयांनी चर्चचे भले होण्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे. पूर्वीच्या चर्चमधील बहुतांश पाद्री विवाहित आहेत. पाद्री म्हणून दीक्षा देण्यापूर्वी विवाहित किंवा अविवाहित रहाण्याचा पर्याय दिला जातो.

३. वाढत्या घटस्फोटांच्या प्रकरणांविषयी पोप म्हणाले की, तरुणांकडून घाईघाईत करण्यात येणार्‍या विवाहांच्या निर्णयांमुळे पुढे घटस्फोट होतात.