दिवा -रत्नागिरी पॅसेंजर १५ मार्चपासून होणार अधिक वेगवान

रत्नागिरी – मुंबई येथून रत्नागिरीपर्यंत येणारी दिवा ते रत्नागिरी ही ‘पॅसेंजर’ रेल्वे १५ मार्चपासून अधिक वेगवान होणार आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कोकणवासियांच्या मागणीनुसार ही गाडी दादरपर्यंत नेण्याची सूचना मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाच्या अधिकार्‍यांना केली होती; मात्र अजूनही पॅसेंजर रेल्वे दादर येथून चालवण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतलेला नाही.

कोकण रेल्वेने सुधारित दिलेल्या वेळापत्रकानुसार दिवा ते रत्नागिरी मार्गावर धावणारी गाडी दिवा येथून संध्याकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी सुटून रत्नागिरीला रात्री १२ वाजून ३५ मिनिटांनी पोचणार आहे. पूर्वी ही गाडी रात्री २ वाजता पोचत होती.

रत्नागिरी येथून सकाळी सुटलेली गाडी दिव्याला दुपारी १.२५ वाजता पोचते. ती परतीच्या फेरीत सायंकाळी ५.५० ला सुटणार आहे. यामध्ये ४ तास २५ मिनिटे गाडी दिवा येथे थांबूनच रहाते. एवढ्या वेळात गाडी पूर्वीप्रमाणे दादरला सहज जाऊ शकणार आहे; मात्र यावर रेल्वे प्रशासन कार्यवाही केव्हा करणार, याकडे प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे.  दिवा ते रत्नागिरी या प्रवासासाठी तब्बल ९ तास १५ मिनिटे लागत होती. आता सुधारित वेळापत्रकामुळे ही गाडी ६ तास ४५ मिनिटांत रत्नागिरीत पोचणार आहे.