पू. अशोक पात्रीकर यांना ७३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
फाल्गुन कृष्ण द्वितीया (९.३.२०२३) या दिवशी सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर यांचा ७३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त नागपूर येथील साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
(भाग १)
१. श्री. मंगेश पागनीस, नागपूर
१ अ. वडिलांच्या प्रकृतीविषयी पू. पात्रीकरकाकांच्या आश्वासक बोलण्यामुळे मन शांत आणि स्थिर होणे : ‘पू. पात्रीकरकाकांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट मला पूर्णपणे पटते. ‘पू. काकांनी सांगितले, म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांनीच सांगितले आहे’, असा विश्वास मला वाटतो. माझ्या वडिलांना कर्करोग झाला असल्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी पू. काकांशी बोलतांना पू. काकांनी सांगितले, ‘‘कर्करोगावर पुष्कळ नवीन औषधे निघाली आहेत. बाबा लवकर बरे होतील. परात्पर गुरु डॉक्टर आपल्या समवेत आहेत. काळजीचे कारण नाही.’’ हे सर्व ऐकल्यावर ‘सर्व व्यवस्थित होणार’, अशी मनाला निश्चिती वाटून माझे मन एकदम शांत आणि स्थिर झाले.’
२. एक साधिका, नागपूर
२ अ. ‘पू. काकांच्या मार्गदर्शनामुळे आज मी स्थिरता, शांतता आणि समाधान अनुभवत आहे.
२ आ. पू. काकांची साधकांना साधनेत पुढे नेण्याची तळमळ आणि प्रेमभाव ! : ‘पू. काकांनी तुम्हाला २ साधकांचे पालकत्व घेण्याची सेवा दिली आहे’, असे एका साधिकेने मला सांगितले. त्या वेळी ‘पू. काकांमध्ये प्रत्येक साधकाला साधनेत पुढे नेण्याची तळमळ, आपुलकी आणि प्रेम आहे’, असे वाटून माझे मन भारावून गेले. पू. काकांविषयी मला पुष्कळ आदर आणि प्रेमभाव वाटतो.
माझ्या जीवनात मला एवढी महान गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) लाभली आणि त्यांच्या कृपेनेच पू. काकांसारख्या संतांच्या मार्गदर्शनाखाली साधना करण्याचे भाग्य लाभले. परात्पर गुरु डॉक्टर आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
३. सौ. पुष्पा बारई, नागपूर
अ. ‘पू. पात्रीकरकाका प्रत्येक मासाला नागपूर येथे ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेचा सत्संग घेणार’, असे मला कळले. माझ्या मनात प्रतिमेचे विचार होते. तेव्हा गुरुदेवांनी मला ‘या सत्संगामुळे तुझ्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण जाईल’, असा विचार दिला. गुरुदेवांच्या कृपेने मी सत्संगाला जाऊ शकले. त्यामुळे माझ्याकडून गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त होत होती.
आ. सत्संगात साधकांनी त्यांच्या चुका सांगितल्यावर पू. काका त्यांना अतिशय प्रेमाने समजावून सांगत होते. आम्हा सर्व साधकांना साधनेविषयी योग्य दृष्टीकोन मिळाल्याने आम्हाला चांगले वाटत होते.
इ. त्यानंतर मी स्वतःची चूक सांगितली. तेव्हा मला हलके वाटले. मी पू. काकांशी मोकळेपणे बोलल्याने माझ्या मनातील साधनेविषयीच्या प्रश्नांना योग्य दृष्टीकोन मिळाले.
ई. पू. काका सर्वांमध्ये अगदी सहजतेने मिसळून सर्वांना आपलेसे करून सहज आणि सोप्या भाषेत साधनेविषयी मार्गदर्शन करतात. पू. काकांनी आमच्याकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करवून घेतल्यामुळे आम्हाला त्यांवर मात करता येऊ लागली. प.पू. गुरुदेव आणि पू. पात्रीकरकाका यांच्या चरणी कृतज्ञता !’
४. सौ. नंदिनी वाकडे, महाल मानेवाडा, नागपूर.
४ अ. ‘पू. काकांना नुसते पाहिले, तरी माझ्यावर आलेले त्रासदायक शक्तीचे आवरण निघून जाते’, असे मी पुष्कळदा अनुभवले आहे.
४ आ. पू. काका आमच्या घरी आल्यावर आमच्यासह आमची वास्तूही चैतन्यमय होते.
४ इ. पू. काकांंनी सांगितलेला मंत्रजप केल्याने ९० टक्के दुखणे न्यून होणे : एकदा एका अपघातामध्ये माझ्या मणक्यात अंतर (गॅप) निर्माण झाल्याने माझ्या सर्व हालचाली थांबल्या होत्या. मला उठता येत नसे. तेव्हा आधुनिक वैद्य मला म्हणाले, ‘‘शस्त्रकर्म केल्याविना पर्याय नाही.’’ मला शस्त्रकर्म करायचे नव्हते. पू. काका घरी आल्यावर मी त्यांना ‘आर्थिक आणि मानसिक दृष्ट्याही शस्त्रकर्म करण्याची माझी सिद्धता नाही’, असे सांगितले. तेव्हा त्यांनी मला मंत्रजप सांगितला. पू. काकांचा संकल्प आणि त्यांनी सांगितलेला मंत्रजप यांमुळे माझे दुखणे ९० टक्के न्यून झाले. उरलेलेे १० टक्के दुखणे ‘ट्रॅक्शन’ (टीप) घेतल्यावर बरे झाले. आता मी स्वतःच गाडी चालवत कार्यालयात जाते. ही सर्व पू. पात्रीकरकाकांच्या रूपाने गुरुदेवांची लाभलेली कृपाच आहे.
टीप – मणक्यांवर ताण देऊन केलेले अस्थि-उपचार’
५. श्रीमती चित्रा खटी, महाल, नागपूर.
५ अ. पू. पात्रीकरकाकांनी रुग्णालयात भेटायला येणे आणि त्यांनी सांगितलेले नामजपादी उपाय नियमित केल्यावर बरे वाटणे : ‘मार्च २०२० मध्ये मी रुग्णाईत होते. माझे डोके पुष्कळ दुखत असल्याने मी १० दिवस रुग्णालयात भरती होते. मला पुष्कळ ‘हाय पॉवर’चे ‘इंजेक्शन’ चालू होते. स्वप्नात मला माझाच मृत्यू दिसत होता. मी पुन्हा ‘इंजेक्शन’ घेण्यासाठी रुग्णालयात गेल्याचे समजल्यावर पू. काका आणि एक साधिका मला भेटायला रुग्णालयात आले. त्यांना पाहून मला पुष्कळ आनंद झाला. त्यांनी माझ्या प्रकृतीविषयी विचारपूस केली. ‘सलाईन’ लावल्यामुळे माझे दोन्ही हात दुखत होते. पू. काकांनी मला ‘हात दुखणे, डोकेदुखी आणि इतर त्रास’ दूर होण्यासाठी नामजपादी उपाय सांगितलेे. ते उपाय नियमित केल्याने मला बरे वाटले.
गुरुमाऊलीच्या कृपेनेच माझी पू. काकांशी भेट झाली. त्यांनी सांगितलेल्या नामजपादी उपायांमुळे मला माझे प्रारब्ध भोगण्याची क्षमता मिळाली आणि पू. काकांची प्रीती अनुभवता आली.’
(क्रमशः उद्याच्या अंकात)
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २१.६.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या/सद् गुरुंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |