वेब सिरीज ‘कॉलेज रोमान्स’चे दिग्दर्शक आणि अभिनेत्री यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचा देहली उच्च न्यायालयाचा आदेश  

वेब सिरीजमधील भाषा अश्‍लील आणि अभद्र !

नवी देहली – देहली उच्च न्यायालयाकडून वेब सिरीज ‘कॉलेज रोमान्स’चे दिग्दर्शक सिमरप्रीत सिंह आणि अभिनेत्री अपूर्वा अरोरा यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला आहे. आदेश देतांना न्यायालयाने म्हटले, ‘या वेब सिरीजमध्ये वापरण्यात आलेली भाषा अश्‍लील, अभद्र आणि बीभत्स आहे. यामुळे तरुणांचे विचार दूषित होतील.’

न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांनी म्हटले, ‘‘आमच्या चेंबरमध्ये इअरफोन लावून आम्हाला ही वेब सिरीज पहावी लागली इतकी अश्‍लील भाषा यात वापरण्यात आली आहे. यातले संवाद अन्य कुणाला ऐकवूही शकत नाही. व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावावर अशा भाषेचा वापर करण्यास अनुमती दिली जाऊ शकत नाही. ही भाषा सामान्य नागरिकाच्या मानसिकतेचा विचार करता शालीनतेच्या कसोटीवर पात्र ठरत नाही.’’

संपादकीय भूमिका

वेबसिरीजद्वारे हिंसा आणि अश्‍लीलता प्रसारित होत असतांना त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने नियमावली काढली; मात्र त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे असले प्रकार चालूच आहेत. सरकारने जनहितार्थ याकडे गांभीर्याने पहाणे आवश्यक !