गुजरातमध्ये इराणी बोटीतून ४२५ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त : ५ जणांना अटक

अटक करण्यात आलेले आरोपी

कच्छ (गुजरात) – भारतीय तटरक्षक दलाने धडक कारवाई करत येथे एका इराणी बोटीतून ४२५ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या बोटीतून ६१ किलोंचे ‘हेरॉईन’ तस्करी करून नेले जात होते. गुजरातच्या आतंकवादविरोधी पथकाला ही माहिती मिळाली. त्यानंतर भारतीय तटरक्षक दलाने त्याच्या गस्तीच्या २ जहाजांद्वारे ही कारवाई केली आहे. या वेळी ५ जणांना अटक करण्यात आली. ओखा किनार्‍यापासून ३४० कि.मी. अंतरावर भारतीय जल सीमा क्षेत्रात ही घटना घडली.

तटरक्षक दलाला ही इराणी बोट दिसल्यावर आरंभी त्या बोटीला थांबण्यास सांगण्यात आले; परंतु बोटीच्या चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तटरक्षक दलाने कारवाई केली. या वेळी बोटीत उपस्थित असणार्‍या नागरिकांकडे इराणी नागरिकत्वाचा पुरावा आढळून आला.