शिगमोत्सवातील सादरीकरणासाठी समयमर्यादेत वाढ करा ! – शिगमोत्सव समित्यांची गोवा सरकारकडे मागणी

गोवा शिगमोत्सव २०२३

वर्ष २०२२ मधील गोव्यातील शिमगोत्सव

कुडचडे, ५ मार्च (वार्ता.) – राज्य सरकारने शिगमोत्सव साजरा करण्यासाठी रात्री १० पर्यंत समयमर्यादा घातली आहे. या वेळेत रोमटामेळ आणि चित्ररथ यांचे सादरीकरण होऊच शकत नसल्याने सरकारने ही वेळ वाढवून ती रात्री १२ वाजेपर्यंत करावी, अशी मागणी ‘अखिल गोवा शिगमोत्सव समित्यां’च्या पदाधिकार्‍यांनी कुडचडे येथे ५ मार्च या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. या वेळी शिरोडा येथील ‘श्री मंडलेश्वर शिगमोत्सव मंडळा’चे शुभम नाईक, सावर्डे येथील ‘सावर्डे शिगमोत्सव मंडळा’चे नीलेश तारी आणि सईश नाईक, केपे येथील ‘श्री चंद्रेश्वर भूतनाथ शिगमोत्सव मंडळा’चे दीपराज नाईक, खांडेपार येथील शिगमोत्सव मंडळाचे पंकज जल्मी आदी उपस्थित होते. गोवा सरकारने आयोजित केलेली शिगमोत्सव मिरवणूक ८ ते २१ मार्च या कालावधीत राज्यात ठिकठिकाणी होणार आहे.

गोवा शिमगोत्सव समितीचे पदाधिकारी

पत्रकार परिषदेत शिगमोत्सव मंडळांनी पुढील सूत्रे मांडली – 

१. रोमटामेळात सहभागी होणारे युवक आणि युवती अनेक ठिकाणी कामाला असतात. ते काम सांभाळून रोमटामेळाचे सादरीकरण करतात. यासाठी रात्री १२ वाजेपर्यंत मिरवणुकीसाठी मुभा द्यावी.
२. पारंपरिक शिगमोत्सवाची कला जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येकाला सादरीकरणासाठी वेळ देणे आवश्यक आहे. आम्ही शिगमोत्सवात केवळ बक्षिस मिळवण्यासाठी सादरीकरण करत नाही, तर संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी आमचा प्रयत्न असतो.
३. स्पर्धेमध्ये रोमटामेळासाठी ठेवण्यात येणारी बक्षिसाची रक्कम फार अल्प आहे आणि ती वाढवून देणे आवश्यक आहे.

____________________________________

फोंडा तालुका अंत्रुज शिगमोत्सव समिती’च्या शिगमोत्सवाला प्रारंभ

‘फोंडा तालुका अंत्रुज शिगमोत्सव समिती’च्या शिगमोत्सवाला ५ मार्च या दिवशी प्रारंभ झाला.

समितीच्या वतीने म्हार्दाेळ येथे श्री महालसा देवीला नमन केल्यानंतर शिगमोत्सवाला प्रारंभ झाला. ६ आणि ७ मार्च या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि ८ मार्च या दिवशी शहरातून रोमटामेळ आणि चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे.