शिवसेना नाव चोरले; मात्र पक्ष चोरू शकत नाही ! – उद्धव ठाकरे

खेड येथील सभेत बोलतांना श्री. उद्धव ठाकरे

रत्नागिरी – देव माणसांचे दर्शन घ्यायला आलो आहे. आज माझे हात रिकामे आहेत. मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही, तरीदेखील तुम्ही इथे जमलात यासाठी पूर्वजांची पुण्याई असावी लागते. शिवसेनेची स्थापना माझ्या वडिलांनी केली. तुमची मला साथ आणि आशीर्वाद हवे आहेत. त्यांनी (शिंदे गटाने) शिवसेना नाव चोरले; मात्र पक्ष कुणीही चोरू शकत नाही, असे उद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खेड येथील गोळीबार मैदानात सार्वजनिक सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपसह निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली.

 (सौजन्य: ABP MAJHA) 

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले,

१. सरकारचे सगळे चांगले चालले असतांना माशी कुठे शिंकली ? बंडखोरी केली आणि अनेक जणांनी भ्रष्टाचार्‍यांशी एकी केली. ‘शिवसेनाप्रमुख’ हा शब्द कुणाकडे जाऊ शकत नाही. कितीही येतील आणि जातील; मात्र शिवसेना कायम राहील. मिंधे सरकार तुम्हाला चालेल का ? ज्यांना पक्षाचे मानले, त्यांनीच स्वत:च्या आईवर वार केले.

२. निवडणुक आयोगाला मोतिबिंदू झाला नसेल, तर शिवसेना काय आहे ? ते त्याने पहायला यावे. निवडणूक आयोग गुलाम आहे. त्याची लायकी नाही.

३. शिवसेनेची स्थापना माझ्या वडिलांनी केली. त्यांच्या (शिंदे गटाच्या) वडिलांनी नाही. निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नाही, ते चिन्ह, नाव देऊ शकत असेल; पण शिवसेना आमची आई आहे. निवडणूक आयोगाचा चोंबडेपणा खपवून घेणार नाही.

४. निवडणूक आयोगाप्रमाणेच केंद्रीय अन्वेषण विभागाला पिंजर्‍यात टाकण्याची वेळ आली आहे.

५. तुम्ही शिवसेना नाही, तर मराठी माणसांच्या आणि हिंदूच्या एकजुटीवर घाव घालत आहात.

६. जो कुटुंब पालटत बसतो तो महाराष्ट्राचे काय दायित्व घेणार ? संपूर्ण महाराष्ट्र माझे कुटुंब आहे.

७. काल परवा आलेले आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवतात.

८. विरोधी पक्षात असाल म्हणजे तुम्ही भ्रष्टाचारी आहात. राजन साळवी गुन्हेगार आहेत का ? त्याच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला आहे. सर्वांत अधिक भ्रष्टाचारी भाजपमध्ये आहेत. भाजपच्या व्यासपिठावर पूर्वी साधू असायचे आणि आता मात्र संधीसाधू बसतात.

९. आज खंडोजी खोपडे कोण आणि कान्होजी जेधे कोण ? हे ओळखण्याची वेळ आली आहे.

१०. केजरीवाल यांच्यासह सर्व विरोधी पक्षांना एकत्र यायचे आहे. देश वाचवण्यासाठी महाराष्ट्र सर्वांच्या पुढे राहील, कधीही मागे रहाणार नाही.

क्षणचित्रे

१. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सकाळीच खेडमध्ये आले होते. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच सार्वजनिक सभा झाली.  आमदार भास्कर जाधव, खासदार विनायक राऊत, माजी पालकमंत्री अनिल परब यांनी उद्धव ठाकरे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

२. उद्धव ठाकरे लोकशाही वाचवणारे नेते असल्याचे सांगून या सभेला उपस्थित रहाण्याचे आवाहन मराठी मुस्लिम सेवा संघाने पत्रक काढून केले होते.

३. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.

४. उद्धव ठाकरे यांच्या सभेनिमित्त सर्वत्र ठाकरे गटाचे फलक लागलेले असतांना शिवसेना नेते रामदास कदम यांच्या नावे लावण्यात आलेला ‘देव माणूस’ हा फलक मात्र चर्चेचा विषय ठरला आहे.

५. माजी आमदार संजय कदम यांनी रामदास कदम यांच्या लावलेल्या फलकावर राक्षसाचा चेहरा लावून होळीत विसर्जन होणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.