‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समिती’ची पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी
पंढरपूर (जिल्हा सोलापूर), ५ मार्च (वार्ता.) – आमलकी एकादशीच्या निमित्ताने ३ मार्च या दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात १ टन द्राक्षांची सजावट केली होती. या सजावटीनंतर अवघ्या १ घंट्यामध्ये १ टन द्राक्षे गायब झाली. मंदिरातील ‘सीसीटीव्ही फुटेज’ची तपासणी करून संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समिती’च्या वतीने येथील पोलीस ठाणे येथे देण्यात आले. याप्रसंगी मंदिर संरक्षण कृती समितीचे अध्यक्ष श्री. गणेश लंके, हिंदु महासभेचे शहर अध्यक्ष श्री. बाळासाहेब डिंगरे, विश्व हिंदु परिषदेचे सामाजिक समरस्ताचे प्रांतिक सदस्य श्री. रवींद्र साळे (सर), हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशिशेखर पाटील, पेशवा युवा मंचचे सर्वश्री प्रणव नाझरकर, ओंकार कुलकर्णी, किशोर कुलकर्णी, ओंकार वाटणे आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, द्राक्षे गायब झाल्याच्या प्रकरणी मंदिर प्रशासनाकडे चौकशी केली असता व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले की, भाविकांनी द्राक्षे तोडून नेली; तर काही द्राक्षे काढून ठेवली. काढलेली द्राक्षे कुणी नेली असतील, तर त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल; मात्र या प्रकरणी कोणती कार्यवाही झाली आहे, हे अद्याप समजलेले नाही. मंदिरातील ही सजावट नेमकी किती काळ चालली ? या काळात गाभार्याचे दार बंद होते किंवा नाही ? शेजारती झाल्यावर सजावट चालू होती का ? याचीही चौकशी होणे आवश्यक आहे.
मंदिर व्यवस्थापकांना पदमुक्त करावे, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार ! – गणेश लंकेश्री विठ्ठल मंदिरात पादत्राणांपासून लाडू ठेक्यापर्यंत सर्वत्र भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभार चालू आहे. यासाठी मंदिराचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड हेच उत्तरदायी आहेत. पुदलवाड यांच्याकडे पदभार असल्यापासून मंदिरात अनेक अपप्रकार आढळून आले आहेत. त्यामुळे ‘पुदलवाड यांना तात्काळ पदमुक्त करावे’, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहोत. |
संपादकीय भूमिकामंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! |