कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता निलंबित !

  • रुग्णालयातील आधुनिक वैद्यांच्या वसतीगृहाच्या दुरवस्थेचे प्रकरण
  • मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांची कारवाई
  • रुग्णांची काळजी घेणार्‍या आधुनिक वैद्यांच्या वसतीगृहाकडे दुर्लक्ष करणारे निष्काळजी प्रशासन !

ठाणे, ५ मार्च (वार्ता.) – ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता आधुनिक वैद्य योगेश शर्मा आणि उप अधिष्ठाता आधुनिक वैद्य सुचितकुमार कामखेडकर यांच्यावर ४ मार्चला निलंबनाची कारवाई करण्यात आली. रुग्णालयातील आधुनिक वैद्यांच्या वसतीगृहाच्या दुरवस्थेस उत्तरदायी असणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर आयुक्त अभिजित बांगर यांनी तातडीने ही कारवाई केली.

ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सुसज्ज प्रसुती कक्ष आणि शस्त्रक्रिया विभाग सिद्ध करण्यात आला आहे. रुग्णालयात रुग्ण आणि नातेवाईक यांच्यासाठी वाचनालय उभारण्यात आलेले आहे. या प्रकल्पांचे ४ मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्या वेळी रुग्णालयातील आधुनिक वैद्यांच्या वसतीगृहाची दुरवस्था असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आले होते. तेथील महिला आधुनिक वैद्यांना भेडसावणार्‍या समस्यांच्या तक्रारी करताच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त अभिजित बांगर यांना दिले.