‘आष्टी’च्या साहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या चौकशीसाठी विशेष अधिकारी नेमण्यात येईल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मुंबई, ४ मार्च (वार्ता.) – आष्टी पोलीस चौकीच्या साहाय्यक पोलीस निरीक्षकांनी अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी अधिकारी नेमण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत ३ मार्च या दिवशी तारांकित प्रश्नोत्तरात दिली.

कोकाटे हादगाव (तालुका परतूर, जिल्हा जालना) येथे शेतीच्या वादातून गावातील २ समुदायांमध्ये वाद झाला. काही लोकांच्या घरांवर आक्रमण करण्यात आल्याने घायाळ झाल्याची तक्रार देण्यासाठी तक्रारदार पोलीस ठाण्यात गेले; पण त्यांच्यावर खोटे गुन्हे नोंद करून आष्टी पोलीस ठाण्याच्या साहाय्यक पोलीस निरीक्षकांनी त्यांना अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे सदस्य गोपीचंद पडळकर यांनी ३ मार्च या दिवशी तारांकित प्रश्नाद्वारे केली होती. त्याला उत्तर देतांना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

ते म्हणाले की, या प्रकरणात मारहाणीच्या ध्वनीचित्रफितीची १५ दिवसांत पडताळणी केली जाईल. जालना पोलीस ठाण्याकडून हे प्रकरण काढून राज्य गुन्हे अन्वेषणाकडे (सीआयडीकडे) देण्यात येईल. त्यासाठी विशेष अन्वेषण अधिकारी नेमण्यात येईल, तसेच ध्वनीचित्रफीतीची पडताळणी झाल्यानंतर त्यामध्ये संबधित दोषी आढळले, तर अधिक कठोर कारवाई करण्यात येईल.