मुंबई, ३ मार्च (वार्ता.) – उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वीच्या) परीक्षेअंतर्गत ३ मार्च २०२३ या दिवशी ‘गणित’ विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील २ पृष्ठे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून प्रसारित झाली असल्याचे वृत्त वाहिन्यांवरून प्रसिद्ध झाले आहे. तथापि या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोचल्याचे राज्यात कुठेही आढळून आलेले नाही. संबंधित घटनेविषयी सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. याविषयी पोलीस अन्वेषण करत आहेत. त्यामुळे ‘गणित’ या विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही, याची विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.
१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, पेपरफुटी प्रकरणावर राज्य शिक्षण मंडळाने घेतला महत्त्वाचा निर्णयhttps://t.co/kZTo6B6vXI #class12thexamhttps://t.co/9g2Ramj1yZ
— Maharashtra Times (@mataonline) March 3, 2023
या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सकाळी १०.३० वाजल्यानंतर प्रसिद्ध झाली आहेत. मंडळ सूचनेनुसार सकाळच्या सत्रात १०.३० वाजेपर्यंत आणि दुपारच्या सत्रात दुपारी २.३० वाजेपर्यंत परीक्षा दालनात परीक्षार्थींनी उपस्थित रहाणे बंधनकारक केले आहे. त्या वेळेनंतर कोणत्याही विद्यार्थ्यास परीक्षा दालनात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे ‘गणित’ विषयाचा पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोचल्याचे राज्यात कुठेही आढळून आलेले नाही, असे मंडळाच्या वतीने कळवण्यात आले आहे.