कफ सिरप बनवणार्‍या १७ आस्थापनांना कारणे दाखवा नोटीस !

विधानसभा लक्षवेधी सूचना

२७ आस्थापने चौकशीच्या फेर्‍यात, ४ आस्थापनांचे उत्पादन बंद, तर ६ आस्थापनांचे परवाने रहित !

मुंबई, ३ मार्च (वार्ता.) – राज्यशासनाच्या औषध प्रशासन विभागाच्या वतीने कफ सिरप सिद्ध करणार्‍या ८४ आस्थापनांची पडताळणी करण्यात आली असून १७ दोषी आस्थापनांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ४ आस्थापनांचे उत्पादन बंद, तर ६ आस्थापनांचे परवाने रहित करण्यात आले आहेत. ज्या उत्पादकाच्या स्थिरता चाचणीमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत, अशा एकूण २७ आस्थापनांवर आवश्यक कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनमंत्री संजय राठोड यांनी ३ मार्च या दिवशी विधानसभेत लक्षवेधी सूचनेवर उत्तर देतांना दिली. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ही लक्षवेधी सूचना विधानसभेत मांडली होती. या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह आमदार योगेश सागर, जयकुमार रावळ आणि तालिका अध्यक्ष संजय शिरसाट यांनी भाग घेतला.

१. देशातून निर्यात झालेल्या सदोष कफ सिरपमधील हानीकारक घटकद्रव्यांमुळे ६६ मुलांचा मृत्यू झाल्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने निदर्शनास आणून दिली.

२. त्यानंतर राज्यात सिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या औषधांची गुणवत्ता पडताळणी (स्टॅबिलिटी स्टेट) झाल्यानंतरच जागतिक बाजारपेठेत पाठवणे बंधनकारक असतांना राज्यातील २०० औषध उत्पादकांकडून सिद्ध करण्यात येणारी २ सहस्रांहून अधिक औषधे कोणत्याही प्रकारचे चाचणी प्रमाणपत्र न घेताच निर्यात होत असल्याचे फेब्रुवारी २०२३ मध्ये आढळून आले. त्यामुळे राज्यातील या २०० औषध उत्पादकांची सखोल चौकशी करून त्यांचे परवाने रहित करून कारवाई करावी, तसेच ही घटना गंभीर असून या प्रकरणी संबंधित आस्थापनांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली.

३. यावर उत्तर देतांना मंत्री संजय राठोड म्हणाले की, राज्यात एकूण ९९६ अ‍ॅलोपॅथी उत्पादक असून त्यापैकी ५१४ उत्पादक निर्यात करतात, तसेच गेल्या वर्षभरात ८ सहस्र २५९ किरकोळ विक्रेत्यांची ही पडताळणी करण्यात आली असून २ सहस्र परवानाधारकांना कारणे दाखवा, तर ४२४ परवाने रहित आणि ५६ जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. हा विषय गंभीर असून याविषयी लवकरच बैठक घेतली जाईल.