अंगणवाडी सेविकांच्या मानधनात २० टक्क्यांनी वाढ करणार !

पर्यटन विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे विधानसभेत आश्वासन

मुंबई, ३ मार्च (वार्ता.) – अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात २० टक्क्यांनी वाढ करण्यात येणार असून मे २०२३ पूर्वी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. अंगणवाडी सेविकांसाठी नवीन भ्रमणभाष खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तसेच सेविकांना लागणारे ‘पोषण ट्रॅकर’ या भ्रमणभाष ‘ॲप’मध्ये मराठी भाषेत माहिती भरण्याची तरतूद करणार असल्याचे आश्वासन पर्यटन विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत दिले.

विविध मागण्यांसाठी मागील अनेक दिवसांपासून अंगणवाडी सेविकांचे राज्यभर आंदोलन चालू आहे. कोरोना काळात अंगणवाडी सेविकांनी केलेले काम कौतुकास्पद असून त्यांच्या नियमितच्या कामांचीही नोंद घेणे आवश्यक असल्याची मागणी विधानसभेत उपस्थित करण्यात आली. त्यावर मंत्री लोढा यांनी अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सकारात्मक विचार करत असून लवकरच मागण्यांच्या पूर्ततेविषयी अधिकृत घोषणा करण्यात येईल, असे सांगितले.