‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ परिसरात फादरकडून होणार्‍या अवैध कृत्यांविषयी ‘शंखवाळ तीर्थक्षेत्र रक्षा समिती’ची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

श्री विजयदुर्गा माता, शंखवाळ-(सांकवाळ) गोवा

वास्को, २ मार्च (वार्ता.) – पुरातत्व खात्याने वारसास्थळ म्हणून घोषित केलेल्या ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या क्षेत्रात पदयात्रा काढणे, तसेच फलक उभारणे याविषयी फादर मॅन्युअल डायस आणि फादर केनिथ टेलेसांड यांच्या विरोधात ‘शंखवाळ तीर्थक्षेत्र रक्षा समिती’ने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

शंखवाळ-(सांकवाळ) तीर्थक्षेत्र परिसरात उभारलेले क्रॉस

या तक्रारीत म्हटले आहे की,

१. फादर मॅन्युअल डायस आणि फादर केनिथ टेलेसांड यांनी २६ फेब्रुवारी २०२३ या दिवशी या जागेतून अवैधपणे पदयात्रा काढली, तसेच त्यांनी या क्षेत्रात ८ क्रॉस उभारले आहेत. आम्ही तक्रार करूनही या ठिकाणी जानेवारीमध्ये अवैधपणे नोवेना आणि सेंट जोसेफ वाझ यांचे ‘फेस्त’ (उत्सव) साजरे केले जातात. या फेस्ताच्या वेळी लावलेले फलक, तसेच पदयात्रेविषयीचे फलक अजूनही या परिसरात आहेत.

२. या क्षेत्रामध्ये प्राचीन विजयादुर्गा मंदिराचे अवशेष असून त्याच्या रक्षणासाठी स्थानिक गावकर्‍यांच्या सहयोगाने आम्ही ही संस्था स्थापन केली आहे. या ठिकाणी विजयादुर्गादेवीच्या भाविकांना प्रार्थना, तसेच काही अर्पण करता यावे, अशी आमची इच्छा आहे.

३. जोसेफ वाझ यांच्याकडून या वारसास्थळाच्या संदर्भातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सदर फादर हे स्थान चर्चच्या कह्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे या स्थळाचे त्वरित संरक्षण व्हावे, अशी मागणी आम्ही करत आहोत. आपण याविषयी हस्तक्षेप करून त्वरित ही अवैध कामे बंद होण्याविषयी कारवाई करावी, अशी विनंती करत आहोत.