खासदार संजय राऊत यांच्‍यावर हक्‍कभंगाच्‍या कारवाईसाठी विधानसभा अध्‍यक्षांकडून १५ सदस्‍यीय समितीची निवड केली जाणार !

खासदार संजय राऊत

मुंबई – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाला ‘विधीमंडळ नाही, तर चोर मंडळ’ म्‍हटल्‍याचे पडसाद विधानसभा आणि विधान परिषदेत उमटले होते. त्‍यानंतर विधीमंडळात प्रचंड वेगाने त्‍याविषयीच्‍या घडामोडी घडत आहेत. राऊत यांच्‍या वक्‍तव्‍यावरून त्‍यांच्‍या विरोधात हक्‍कभंगाची कारवाई केली जाणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, विधानसभा अध्‍यक्षांकडून हक्‍कभंग समिती नियुक्‍ती केली जाणार आहे. अध्‍यक्षांकडून १५ सदस्‍यीय समितीची निवड होणार आहे. या समितीत सत्ताधारी पक्षाचे १०, तर विरोधी पक्षाचे ५ सदस्‍य असणार आहेत. हक्‍कभंग समितीचे अध्‍यक्षपद भाजपकडे जाणार आहे. यासाठी भाजपचे आमदार राहुल कुल यांच्‍या निवडीची शक्‍यता आहे. समितीकडून संजय राऊत यांना

‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यानंतर संजय राऊत यांना पुढील ४८ घंट्यांत उत्तर द्यावे लागेल. ‘संजय राऊत राज्‍यसभेचे खासदार असल्‍यामुळे एवढ्या मोठ्या पदावर असणार्‍या व्‍यक्‍तीने विधीमंडळाविषयी असे वक्‍तव्‍य करणे चुकीचे आहे. त्‍यांच्‍याकडून पुन्‍हा असे वक्‍तव्‍य होऊ नये यासाठी त्‍यांच्‍या विरोधात हक्‍कभंगाची कठोर कारवाई करण्‍यात यावी’, अशी मागणी सत्ताधारी पक्षाच्‍या आमदारांनी केली आहे.