१५ दिवसांत कार्यवाही न झाल्यास पुन्हा आंदोलनाची चेतावणी
वेंगुर्ला – तालुक्यातील रेडी येथील यशवंतगडाच्या नजीक झालेले अवैध उत्खनन आणि करण्यात आलेले बांधकाम यांना उत्तरदायी असलेल्यांवर नियमानुसार योग्य कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर गेले ८ दिवस चालू असलेले दीर्घकालीन उपोषण शिवप्रेमींनी स्थगित केले आहे; मात्र १५ दिवसांत उचित कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी उपोषणकर्त्यांनी या वेळी दिली. त्यामुळे ज्या उद्देशाने हे आंदोलन चालू करण्यात आले होते, त्याला प्राथमिक टप्प्यात यश आल्याचे दिसत आहे.
येथील शिवप्रेमी तथा भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचे कोकण प्रांताचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन रेडकर आणि भूषण मांजरेकर या शिवप्रेमींनी २० फेब्रुवारीपासून हे आंदोलन चालू केले होते. या कालावधीत विविध संघटना आणि राजकीय पक्ष यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.
२७ फेब्रुवारी या दिवशी पुरातत्व खात्याचे रत्नागिरी येथील विभागीय कार्यालयाचे साहाय्यक उपसंचालक डॉ. विलास वाहाणे, वेंगुर्लाचे नायब तहसीलदार संदीप पानानंद, विस्तार अधिकारी गुरुनाथ धुरी, रेडीचे तलाठी श्रीमती एस्.एस्. सोळंखी, मंडळ अधिकारी भानुदास चव्हाण यांच्यासह अन्य अधिकार्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. या घटनेत विविध खात्यांचा अंतर्भाव असल्याने त्या त्या खात्याच्या अंतर्गत कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले. पुरातत्व खात्याच्या अधिकार्यांनी ‘सध्याचे बांधकाम वास्तूच्या संरक्षित क्षेत्रात येत नसल्याचे सांगत सध्याच्या प्रचलित कायद्यानुसार या कामाशी संबंधित असलेल्यांवर कारवाई करण्यास असमर्थता दर्शवली; मात्र मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुरातत्व खात्याच्या अंतर्गत येणार्या वास्तूंचे संरक्षित क्षेत्र आणि नियंत्रित क्षेत्र (वास्तूच्या सभोवतालचा परिसर) निर्धारित करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही चालू असून तसा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यानुसार क्षेत्र निश्चित झाल्यावर उचित कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
गड-किल्ल्यांच्या रक्षणासाठी कडक कायदे करा ! – राजन रेडकर, शिवप्रेमी
आम्ही करत असलेले आंदोलन वैयक्तिक नसून महाराष्ट्राचे दैवत असलेल्या शिवछत्रपतींच्या गडांविषयी आहे. छत्रपतींच्या गडांच्या एका दगडालाही कुणी हात लावू नये, असे कडक कायदे करावेत, अशी आमची शासनाला विनंती आहे. संबंधित अधिकार्यांनी आमच्या मागण्यांनुसार उचित कारवाई लवकरात लवकर करू, असे आश्वासन आम्हाला दिले आहे. शासनानेही नियमांनुसार उचित कारवाई लवकरात लवकर करावी. प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आम्ही आंदोलन तूर्तास स्थगित करत आहोत, असे श्री. राजन रेडकर यांनी या वेळी सांगितले.
संपादकीय भूमिकायशवंतगडाच्या रक्षणासाठी चालू असलेल्या आमरण उपोषणाकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन लज्जास्पद ! |