मुंबई – राज्य परिवहन महामंडळाच्या भूम (जिल्हा धाराशिव) येथील आगारातील काचा नसलेल्या एका बसगाडीचे छायाचित्र सध्या मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमांतून प्रसारित होत आहे. या बसगाडीत एक वृद्ध आणि लहान मुलगा खिडकीत बसले आहेत; मात्र खिडक्यांना काचाच नाहीत. तसेच बसचा पत्राही तुटला आहे. अत्यंत दुरवस्था झालेल्या या बसगाडीवर मात्र ‘वर्तमान साकार, भविष्यास आकार, योजना दमदार, जनतेचे हे सरकार’ आणि ‘निर्णय वेगवान महाराष्ट्र गतीमान’ अशी वाक्ये असलेले राज्य शासनाचे विज्ञापन आहे. त्यामुळे विरोधाभास दर्शवणारे हे छायाचित्र बोलके झाले आहे. देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य परिवहन मंडळ विविध योजना राबवत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मार्ग परिवहन महामंडळ मात्र गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक संकटात आहे. कर्मचार्यांचे थकलेले वेतन यांसारखे अनेक प्रश्न सध्या महामंडळापुढे आहेत. नव्या बसगाड्या शहरांसाठी आल्या आहेत; मात्र अनेक गावांत बसगाड्यांची दुरवस्था आहे.