सरफराज मेमन नावाचा धोकादायक आतंकवादी मुंबईत !

मुंबई – पाकिस्तान, चीन आणि हाँगकाँग येथे आतंकवादी प्रशिक्षण घेतलेला सरफराज मेमन नावाचा ‘धोकादायक’ आतंकवादी मुंबईत आल्याचे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.) मुंबई आणि इंदूर पोलीस यांना कळवले आहे. तो मूळचा मध्यप्रदेशातील इंदूर येथील रहाणारा आहे. त्याची सर्व ओळखपत्रेही मुंबई पोलिसांना पाठवण्यात आली आहेत आणि पोलिसांना सतर्क रहाण्यास सांगितले आहे. महाराष्ट्रातील अन्य शहरांनाही सतर्क रहाण्याची सूचना देण्यात आली आहे.


काही दिवसांपूर्वी तालिबानचा सदस्य असल्याचे सांगणार्‍या एका व्यक्तीने मुंबईत आक्रमण करण्याची धमकी दिली होती. तालिबानचा नेता सिराजुद्दीन हक्कानी याच्या आदेशाने तो हे करत असल्याचे त्याने सांगितले होते. मुंबई पोलीस आणि राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा मिळून याविषयी अन्वेषण करत आहेत.