सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत विविध ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सांगली, कोल्हापूर  आणि सातारा जिल्ह्यांत विविध संघटनांच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.

१. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांच्या साहित्य निर्मितीतून मराठी भाषेला वैभव प्राप्त करून दिले ! – शेखर धर्माधिकारी, कोल्हापूर

कोल्हापूर येथे श्री. नितीन वाडीकर यांच्या घरी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करतांना मान्यवर

कोल्हापूर – स्वातंत्र्यवीर सावरकर इंग्लंडमध्ये असतांना ब्रिटीश सत्तेला धक्का देण्यासाठी त्यांनी मदनलाल धिंग्रांसारखे अनेक क्रांतीकारक सिद्ध केले. देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली स्वातंत्र्यवीरांना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यावर बोटीतून भारताकडे येत असतांना त्यांनी मार्सेलिसच्या बंदरात बोटीतून उडी टाकली. या प्रसंगाची संपूर्ण जगाने नोंद घेतली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाट्य, विज्ञान, साहित्य अशा अनेक विषयांवर प्रभुत्व होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांच्या साहित्य निर्मितीतून मराठी भाषेला वैभव प्राप्त करून दिले, असे प्रतिपादन कोल्हापूर येथील नामांकीत लेखापरीक्षक श्री. शेखर धर्माधिकारी यांनी केले. ते स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य आणि विज्ञान मंडळाच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. नितीन वाडीकर, सौ. मनीषा वाडीकर, सर्वश्री राजेंद्र शिंदे, मालोजी केरकर, मोरेश्वर दामले यांसह अन्य उपस्थित होते.

सांगली येथे चित्पावन परिवाराच्या वतीने पुण्यतिथी साजरी !

सांगली येथे चित्पावन परिवाराच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करतांना मान्यवर
सांगली महापालिकेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करतांना मान्यवर

सांगली – येथे चित्पावन परिवाराच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या प्रसंगी सांगलीचे चित्पावन परिवारचे अध्यक्ष श्री. वामन बर्वे, सर्वश्री चंद्रकांत पाटणकर, बाळासाहेब पोतदार, विनायक कुननूर, शरद फडके, गिरीश परचुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी साहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, अग्नीशमन अधिकारी विजय पवार, अशोक माणकापुरे, श्रीपाद बासुदकर, कमलकार कुलकर्णी, दिगंबर सूर्यवंशी उपस्थित होते.

मिरज येथे ज्ञानप्रबोधिनी शाळेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करतांना मान्यवर

मिरज – भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार नोंदणी शिबिराचा शुभारंभ करण्यात आला, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकवण्यात आला. या प्रसंगी श्री. प्रसाद कुलकर्णी, प्रा. मोहन व्हनखंडे, भाजपच्या नगरसेविका सौ. भारती दिगडे, माजी महापौर सौ. संगीता खोत, नगरसेवक श्री. पांडुरंग कोरे, भाजपचे सरचिटणीस श्री. मोहन वाटवे, शहराध्यक्ष श्री. बाबासाहेब आळतेकर, सर्वश्री सुमेध ठाणेदार, राज कबाडे, उमेश हारगे, शशीकांत वाघमोडे, दिगंबर जाधव यांसह अन्य उपस्थित होते.

हिंदु महासभेच्या पुढाकाराने सातारा शहरातील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करतांना सातारा येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते

सातारा – हिंदु महासभेच्या पुढाकाराने सातारा शहरातील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने स्वा. सावरकर यांना आत्मार्पणदिनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहरातील मोती चौक ते राधिका टॉकीज या मार्गाचे स्वा. विनायक दामोदर सावरकर मार्ग असे नाव असून मोती चौकात तसा नामफलक आहे. या फलकाला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तेथेच स्वा. सावरकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख कार्यवाह अधिवक्ता दत्ताजी सणस, जिल्हाध्यक्ष धनराज जगताप, कार्यकारिणी सदस्य उमेश गांधी, वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. बबनराव सापते महाराज, दैनिक सनातन प्रभातचे राहुल कोल्हापुरे, हिंदुत्वनिष्ठ नितीन नारकर, समाजसेवक धीरज घाडगे, अधिवक्ता अघोर, शिवसेना (उबाठा) जिल्हा आरोग्य सेवेचे जिल्हाध्यक्ष निमिष शहा आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या वेळी उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी हिंदु महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष स्व. अधिवक्ता गोविंद गांधी, प्रखर हिंदुत्वनिष्ठ स्व. अधिवक्ता शिरिष दिवाकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.