त्रिशूर (केरळ) येथील श्रीकृष्ण मंदिरात धार्मिक विधींसाठी यांत्रिक हत्तींचा वापर करण्यात येणार !

त्रिशूर (केरळ) – येथील इरिंजादापल्ली श्रीकृष्ण मंदिरात आता धार्मिक विधी करण्यासाठी हत्तींऐवजी यांत्रिक हत्ती वापरण्यात येणार आहे. या हत्तीची उंची साडे दहा फूट असून त्याचे एकूण वजन ८०० किलो आहे. या हत्तीवर ४ जण स्वार होऊ शकतात. या हत्तीची सोंड, डोके, डोळे आणि कान सर्व विजेवर चालतात.

१. केरळच्या मंदिरांमध्ये केल्या जाणार्‍या धार्मिक विधींमध्ये हत्तीला पुष्कळ महत्त्व आहे. काहीवेळा हे हत्ती विधीच्या वेळी किंवा त्यापूर्वी संतप्त होतात. त्यामुळे अनेक वेळा लोकांना जीव गमवावा लागतो. यामुळेच श्रीकृष्ण मंदिर समितीने धार्मिक विधींसाठी हत्तींचा वापर न करण्याचा निर्णय घेतला होता. यावर प्राण्यांच्या संरक्षणासाठी काम करणार्‍या ‘पेटा इंडिया’ या संस्थेने हा यांत्रिक हत्ती मंदिरात सादर करण्याचा निर्णय घेतला.

२. ‘पेटा इंडिया’चे म्हणणे आहे की, बंदी बनवून ठेवल्यामुळे अनेक वेळा हत्ती चिडतात. जेव्हा त्यांच्या इच्छेविरुद्ध काम केले जाते, तेव्हा त्यांचा उद्रेक होतो आणि त्यामुळे लोकांना जीव गमवावा लागतो.

३. ‘हेरिटेज अ‍ॅनिमल टास्क फोर्स’च्या अहवालानुसार केरळमध्ये गेल्या १५ वर्षांत हत्तींच्या आक्रमणामुळे ५२६ लोकांचा मृत्यू झाला आहे. चिकट्टुकवू रामचंद्रन् नावाचा हत्ती केरळच्या सणांमध्ये सर्वाधिक वापरला जातो. या हत्तीने ६ माहूत, ४ महिला आणि इतर ३ हत्तींसह १३ जणांचा बळी घेतला आहे.